चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आता महापालिकेच्या उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. दररोज मिळणारे उत्पन्न अल्पमुदत ठेवींच्या (फिक्‍स डिपॉझिट) स्वरुपात विविध बॅंकांमध्ये ठेवल्याने त्यातून महापालिकेला 50 कोटी 11 लाख रुपये मिळाले आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे.

यापूर्वी महापालिका दररोज मिळणारे उत्पन्न चालू खात्यात जमा करत होते. हे पैसे खात्यांमध्ये निष्क्रिय पडून असायचे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी महापालिकेच्या चालू खात्यातील रक्कम अल्प मुदतठेवींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. परिणामी महापालिकेच्या दररोजच्या उत्पन्नावर दर महिन्याला कोट्यवधी रुपये मिळत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी लगेच खर्च होत नसल्यामुळे तो विविध बॅंकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरुपात ठेवला जातो.

महापालिका बॅंकांमध्ये ठेवत असलेल्या मुदत ठेवींमुळे वर्षाला 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 व्याज मिळत होते. मात्र महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपने उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने दररोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात विविध बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयाला पाठबळ दिले. दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्यामध्ये जमा करत असल्याने त्याचा महापालिकेला फायदा होण्याऐवजी संबंधित बॅंकांचा आर्थिक फायदा होत होता. त्यामुळे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला. त्यानुसार महापालिकेच्या चालू खात्यांमधील जमा रक्कम अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात बॅंकांमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विविध बॅंकांकडून ठेवींवर किती व्याजदर देणार याची माहिती मागविली होती. त्यातील जास्तीत जास्त व्याजदर देणाऱ्या बॅंकांमध्ये अल्पमुदतीच्या ठेवी ठेवण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला अल्पमुदत ठेवींच्या माध्यमातून एकूण 50 कोटी 11 लाख 88 हजार 132 रुपये व्याज मिळाले आहे. आजमितीला महापालिकेने विविध बॅंकांमध्ये एकूण 2 हजार 957 कोटी 92 लाख 81 हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवले आहे. त्याच्या माध्यमातून 205 कोटी 83 लाख 13 हजार 727 रुपये महापालिकेला मिळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =