चौफेर न्यूज पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत दोन ते अडीच हजार पेक्षा अधिक जाहिरात होर्डिंग उभे आहेत. जागा मिळेल त्या ठिकाणी त्या होर्डिंग उभे केले आहेत. विशेषतः रस्त्याच्या कडेला व चौकांत होर्डिंगची गर्दी पाहायला मिळते. महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी रस्ता) व आरक्षित जागेवरही होर्डिंग उभे आहेत. कशाही रीतीने उभे केलेले हे होर्डिंग पडून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यात जुन्या बाजार चौकात गुरुवार (दि.५) झालेल्या दुर्घटनेत होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जणांचा हाकनाक बळी गेला, तसेच आठ जण गंभीर जखमी झाले आहेत, या घटनेची पुनरावृत्ती पिंपरी – चिंचवड शहरात होवू नये म्हणून शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत जाहीरात होर्डिंगचा सर्व्हे करून धोकादायक होर्डिंग हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

त्यांनी महापौर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड शहरात पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यात होर्डिंग पडून २ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावर सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेत आकाश चिन्ह परवाना विभाग तसेच अतिक्रमण विभागावर ताशेरे ओढण्यात आले होते. विना परवाना होर्डिंग तातडीने तोडून मालक किंवा एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करावे, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु वाढदिवस, वेगवेगळे सन व उत्सवांनिमित्त या विभागाचे खासदार, आमदार, महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांचे मोठमोठे फोटो लाऊन या जाहिरात एजन्सी फुकट प्रसार आणि प्रचार करतात. र या नेते मंडळींना दक्षणा ही देतात. तसेच सबंधित महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी हफ्ते वसूल करतात. ते हफ्ते वर पर्यंत जातात. त्यामुळे आर्थिक हित सबंध जोपासत “तेरी भी चूप, मेरी भी चूप” असा कारभार करून आपण व आपले प्रशासन शहर वासियांच्या जीविताशी खेळण्याचे काम करीत आहे.

पिंपरी चिंचवड शहरचा स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झालेला असून या स्मार्ट सिटी अंतर्गत, स्मार्ट सिटी संकल्पनेमध्ये होर्डिंग विरहित शहराची अट आहे. तसेच मा.उच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी महापालिकेला निर्देश दिलेले असताना केवळ लाच खोरीमुळे मृत्यूचे हे होर्डिंगचे लोखंडी सांगाडे पिंपरी चिंचवडकरांची प्राण घेण्यास आ वासून दिमाखात उभे आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची खुलेआम साक्षच ते देत आहेत.

तरी शहरातील अधिकृत व अनधिकृत जाहिरात होर्डिंगचे सर्वे करून धोकादायक होर्डिंग उभे असण्याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व होर्डिंगवर कायदेशीर कडक कार्यवाही त्वरित करावी, असेही भापकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 4 =