पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. मतदानाला 10 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मुख्यमंत्र्यापासून अनेक वजनदार नेते शहरात येत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. त्यामुळे वाढत्या उन्हाबरोबरच शहरातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
 

सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचार जोरात सुरू केला आहे. होम-टु होम, रॅली, पदयात्रा काढल्या जात आहेत. राजकीय पक्षांनी आगामी पाच वर्षात काय करणार याचा जाहीरनामा, वचननामा जाहीर केला आहे. त्यामध्ये भरघोस आश्वासनांची खैरात केली आहे. पिंपरी महापालिकेच्या 128 जागांसाठी 32 प्रभागात 21 फेब्रुवारीला मतदान होत आहे. मतदानाला केवळ 10 दिवस उरले आहेत.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड येथील  सभेत राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. पिंपरी-चिंचवड महापालिका करोडपती होती. राष्ट्रवादीने तिला लखपतीवर आणले असून पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आल्यावर रोडपती होईल, अशी टीका करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.
 

माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्व पक्षाच्या अगोदर प्रचाराचा नारळ फोडून पक्ष बदलणा-या नेत्यांवर आणि केंद्र, राज्य सरकारवर टीका केली होती. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवरांची एक बैठक घेऊन प्रचाराची माहिती घेतली आहे.
 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख अमोल कोल्हे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री काहीही आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जी कामे होणार आहेत, अशीच आश्वासने द्यावीत, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर, सभास्थळी होलसेल गाजराची विक्री असे फलक लागतील. शास्तीकराचा निर्णय म्हणजे केवळ धूळफेक आहे. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न जैसे थेच आहे, अशा विविध मुद्याला हात घालत शिवसेनेने भाजपला लक्ष केले आहे.
 

शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी चिखलीतील सभेत तर शिवसेनेची सत्ता येताच भाजपमधील गुंडांना तुरुंगात टाकणार असल्याचे सांगितले. भाजपच्या काळात 65 हजार शेतक-यांच्या आत्महत्या झाल्याचे त्यांचेच मंत्री सांगत आहेत. आपण काय बोलत आहोत. याचे भानही त्यांच्या नेत्यांना राहिले नाही, अशी टीका केली आहे.
 

प्रचाराचे शेवटचे 10 दिवस उरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्य मंत्रिमंडळातील  मंत्री, माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांची राळ उठणार आहे. यामुळे शहरातील जनतेचे मात्र मनोरंजन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 4 =