चौफेर न्यूज –  मिळकत कराची थकबाकी ५ हजार रुपये पेक्षा अधिक असणाऱ्या मिळकतधारकांना नोटीसा बजाविल्यानंतरही सात दिवसांच्या आत मिळकत कराची रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे अशा १ लाख १३ हजार मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. त्यानंतर मिळकतीवर जप्तीची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहआयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत ३ जानेवारी अखेर ज्या मिळकतधारकांकडे ५ हजार रुपयेपेक्षा जास्त थकबाकी आहे. अशा १ लाख १३ हजार ३७२ मिळकत धारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. नोटीस बजावुनही मिळकत कराची थकीत रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास अशा थकबाकीधारकांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार जप्तीची कारवाई केली जाणार आहे.

आजअखेर २ लाख ७८ हजार मिळकत धारकांनी ३८० कोटी ४३ लाख एवढा मिळकतकराचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक १ लाख १८ मिळकत धारकांनी ऑनलाईन पेमेंट सुविधेचा वापर करून १३५ कोटी ६० लाख रुपये भरणा केला आहे. नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सर्व कर संकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत.

मिळकत करधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा उपयोग घेणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 4 =