आर्थिक तरतुदींमध्ये घसघशीत वाढ
पिंपरी : महापालिकेच्या नागर वस्ती विभाग व महिला बाल कल्याण योजनेतंर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा आर्थिक दृष्ट्या मागास, अंध, अपंग, विधवा, शालेय विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींना लाभ दिला जातो. 2016-17 या आर्थिक वर्षांसाठी महापालिकेकडे 13 हजार 161 लाभार्थ्यांनी या लाभासाठी अर्ज केले आहे. विविध योजनांच्या आर्थिक तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मागासवर्गीयांसह आदी नागरिकांच्या कल्याणासाठी तब्बल 28 कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यांना वर्षातून एकदाच आर्थिक लाभ दिला जातो. 2016-17 या सुरू आर्थिक वर्षात प्रमुख चार योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पूर्वी 31 कोटी 70 लाख तरतूद होती. ती आता 35 कोटी 54 लाख 50 हजार एवढी करण्यात आली आहे.
मागासवर्गीय कल्याणकारी योजनेमध्ये पूर्वी 5 कोटी 39 लाख 40 हजार तरतूद होती. ती 8 कोटी केली आहे. अपंग कल्याण योजनेमध्ये 12 कोटी 96 लाखांच्या तरतुदीमध्ये वाढ करून 13 कोटी 30 लाख 25 हजार एवढी करण्यात आली आहे. तर, इतर कल्याणकारी योजनांमध्ये मात्र कपात करण्यात आली आहे.
यामध्ये पूर्वी 11 कोटी 39 लाख 50 हजारांवरून थेट 7 कोटी 39 लाख एवढी केली आहे. या सर्व योजनांसाठी महापालिकेने तब्बल 65 कोटी 5 लाखांची आर्थिक तरतुद केली आहे. दरम्यान, या विविध 28 योजनांसाठी 3 नोव्हेंबर अखेर 13 हजार 161 लाभार्थ्यांनी महापालिकेकडे लाभासाठी अर्ज केले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची नागर वस्ती विभागामार्फत समूह संघटक, समाज सेवक, सहाय्यक समाज विकास अधिकारी व समाज विकास अधिकारी छाननी करणार आहेत. त्यानंतर लाभार्थ्यांला लाभ दिला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × five =