पिंपरीत चंद्रकांता सोनकांबळे ह्याच उमेदवार; टॅगलाईन फिरतेय सोशल मीडियावर 
पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पिंपरी विधानसभेतील भाजपा-शिवसेनेतील इच्छुकांनी सोशल मीडियावर ‘आमचं ठरलंय’, तसेच ‘आमचं तुमच्या अगोदर ठरलयं’ अशी बॅनरबाजी सुरू केली आहे. त्यात आता मित्र पक्ष रिपाईने देखील उडी घेतली आहे. ‘मित्र पक्षानो आमचं तर तुमच्या दोघांच्या पहिलेच ठरलयं’ पिंपरीत चंद्रकांता सोनकांबळे ह्याच उमेदवार असतील आणि आमदारही होतील अशी टॅगलाईन सोशल मीडियावर फिरत आहेत.
कार्यकर्त्यांना ठाम विश्‍वास…
महायुतीनंतर मावळ आणि शिरूर या दोन मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी भाजपच्या आमदार आणि अन्य पदाधिकार्‍यांनी विधानसभेची गणिते सोडवून घेतली. युतीत शिवसेनेच्या वाट्याला येणार्‍या पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदार संघावर भाजप दावा करू लागले आहे. तसा शब्द लोकसभा निवडणुकीत मिळविल्याची चर्चा देखील करण्यात येत आहे. पिंपरी विधानसभासाठी यावेळीही भाजप-शिवसेना मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (अ) उमेदवार असणार असे ठाम मत कार्यकर्ते सोशल मिडीयावर मांडत आहेत.
टिकीटासाठी होणार रस्सीखेच…
रिपाईकडून चंद्रकांता सोनकांबळे तीव्र इच्छुक आहेत. शिवसेनेचे पिंपरीतील आमदार गौतम चाबूकस्वार यांच्या कामगिरीची चर्चा पाच वर्षांत म्हणावी तशी झालेली नाही. त्यामुळे शिवसेनेकडून पिंपरीसाठी दुसरा तरुण चेहरा समोर आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेत युवासेनेचे जितेंद्र ननावरे आणि शिवशाही व्यापारीसंघाचे युवराज दाखले हे इच्छुक आहेत. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी मागील पाच वर्षांत ‘प्रथम आमदार’ असा प्रचार सुरू ठेवला आहे. त्यामुळे बनसोडे आगामी काळात प्रचारात आघाडी घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
साबळे, गोरखे, सावळे देखील तयारीत…
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस बनसोडे यांना उमेदवारी देणार की ऐन वेळेस उमेदवार बदलणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीत नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. तर भाजपकडून देखील या मतदारसंघावर दावा केला जातोय. खासदार अमर साबळे यांची कन्या वेणू साबळे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे आणि नगरसेविका सीमा सावळे यांनी तशी तयारी सुरू केली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातिसाठी राखीव असल्याने भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी समाजासाठी रस्त्यावर उतरण्याच्या पाठीशी उभे राहण्याचा सोशल मिडीयावर मेसेज फिरत आहेत.
काय आहे व्हायरल मेसेजमध्ये..
पिंपरी विधानसभा
मित्र पक्षानो आमचे तर तुमच्या दोघाच्या पहिलेच ठरले आहे
पिंपरी विधानसभा मतदार संघ हा रिपाई (-) चा बालेकिल्ला आहे व त्या मतदार संघावर आमचाच हक्क आहे. पिंपरी मतदार संघात मा. चंद्रकांताताई सोनकांबळे ह्याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (-) व मित्रपक्षाच्या उमेदवार असतील. मित्रांनो 1/1/2018 रोजी भिमाकोरेगावात आपल्या महिला, लहान मुले व वयस्कर लोकांवर जातीयवादी गुंडानी हल्ला केला व त्या नंतर पिंपरीत 2/1/2018 रोजी पिंपरीमध्ये भिडे एकबोटे वर वर पहिला गुन्हा दाखल झाला. त्या 2 व 3 जानेवारी 2018 च्या पिंपरी चौकात आंदोलन झाले त्या आंदोलनात जे नेते सामिल होते अश्या नेत्यांनीच पिंपरी मतदार संघासाठी दावेदारी करावी. विद्यमान आमदार, माजी आमदार, विद्यमान खासदार (राज्यसभा), व जे आता उमेदवारीसाठी आमचं ठरलयं असे पोस्ट वायरल करतात ते त्या भिमाकोरेगाव हल्ल्याच्या वेळेस महापालिकेची तिजोरी संभाळण्यात व्यस्त असणार्‍या सिमाताई सावळे यांना पिंपरी विधानसभेत (मागासवर्ग) थांबण्याचा कसलाही अधिकार नाही. व जे आता गुडग्याला बाशींग बांधुन चिंचवड विधानसभेत राहणार्‍या व कधीही बहुजनांच्या आंदोलनात सहभागी नसणार्‍या युवक नेत्यांनी तर पिंपरी विधानसभेत फिरकुही नये. वरील अश्या सर्व नेत्यांना ज्यांनी भिमाकोरेगाव हल्ल्या विरूध्द आवाज उचलला नाही अश्या नेत्यांनी पिंपरी विधानसभेतील बहुजन वस्त्या मध्ये फिरू नये, अन्यथा बहुजन जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल
   सुरेश निकाळजे
पश्‍चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष
रिपब्ल्कन पार्टी ऑफ इंडिया (-).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × three =