पिंपळनेर ः आई एकविरा फाऊंडेशन संचलित पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात रविवार दि. ३ फेब्रुवारी रोजी प्रचिरंग वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात पार पडले. या वेळी समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, पारंपारिक वेशभूषा, नाटक, रांगोळी,  पोस्टर्स सादरीकरण, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना चालना मिळावी, त्यांच्यातील कलाकार जिवंत राहावा, नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी, यासाठी भारतीय संस्कृती, समस्या आणि मनोरंजन या थीमवर वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन प्रशांत भिमराव पाटील, प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अतुल देव, साक्री प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, प्राचार्या वैशाली लाडे, इंटरनॅशनल स्कूलचे समन्वयक तुषार देवरे, राहुल अहिरे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी, स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांना पिंपरी चिंचवड येथील खान्देश मराठा मंडळाच्यावतीने खान्देश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात समूह नृत्याने करण्यात आली. त्यानंतर हिंदी, मराठी गीतांसह  गोंधळ नृत्यावर विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला होता. आजचे विद्यार्थी  सजग असून आजूबाजूच्या घडणाऱ्या घडामोडींवर ठाम मत मांडण्याचा अधिकार त्यांनाही असल्याने देशाच्या विकासात सकारात्मक बदल घडविणारी आपली मत सर्वांसमोर मांडण्यासाठी त्यांना व्यासपीठाची गरज आहे. हे लक्षात घेऊन प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून वर्षभरात विविध स्पर्धा घेण्यात येत असल्याचे मत स्कूलचे चेअरमन प्रशांत पाटील यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  ते म्हणाले पुढे, ‘विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही आवश्यकता असते. वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी महत्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.’ यावेळी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, गीतगायन, लघुनाटिका, आदी प्रकारांचे सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळविली. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच, सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षीका अनिता पाटील, वर्षा भामरे यांनी केले. प्राचार्या वैशाली लाडे यांनी प्रास्ताविकात स्कूलच्या विकासाचा आराखडा सादर केला. आभार अर्चना देसले
यांनी मानले. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − twelve =