चौफेर न्यूज –  पीएमपीएमएल मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४० टक्के हिस्सा आहे. तरी देखील आमच्या कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळते, त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये नेहमी जुन्या बस आढळून येतात तसेच बसेसची संख्या देखील अपुरी असते. पीएमपीएमएलचे अधिकारी आमच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करून पीएमपीएमएल मधून पीसीएमटी वेगळी करण्याची मागणी करणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महापौर राहुल जाधव यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकीत म्हटले आहे की, पीसीएमटी आण पीएमटी यांचे सन २००७ मध्ये एकीकरण होऊन पीएमपीएमएल या स्वतंत्र संस्थेची स्थापना झाली. सदर कंपनीचा कारभार चालवण्यासाठी पुणे महापालिका ६० टक्के व पिंपरी चिंचवड पालिका ४० टक्के रक्कम अदा करण्याचे ठरले होते. त्यानुसार सन २००७ पासून पिंपरी चिंचवड महापालिकेने पीएमपीएमएलला ठरल्याप्रमाणे ४० टक्के रक्कम नियमितपणे अदा केली आहे. तरीही पीएमपीएमएल मधील कुठल्याही निर्णय प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. पूर्वीच्या पीसीएमटी कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, त्यांची सेवाज्येष्ठता डावलली जात असल्याचे दिसून येते. पीएमपीएमएल कंपनीची सेवा नागरिकांना व्यवस्थितपणे भेटत नाही. पिंपरी चिंचवड शहरासाठी बसची संख्या अपुरी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नेहमी जुन्या प्रकारच्या बस आढळून येतात. वेळेवर बस येत नसल्याने नागरिकांना कायम त्रासाला सामोरे जावे लागते. संचालक मंडळाची बैठक ठरलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित केल्या जात नाहीत. पीएमपीएमएल कंपनीचे अधिकारी हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक, अधिकारी व पदाधिकारी यांना सन्मानपुर्वक वागणुक देत नाहीत. त्यांनी दिलेल्या पत्रांना उत्तरे दिली जात नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून नियमितपणे ७ ते ८ बसेस दररोज बंद पडण्याचे व अनेक बस पेटण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बस डेपोमध्ये कुशल कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. नागरिकांच्या तक्रारीचा कल लक्षात घेता पीएमपीएमएलचे विलगीकरण करुन पीसीएमटी वेगळी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकचे करणार असल्याचे महापौर राहुल जाधव यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 10 =