चौफेर न्यूज – प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले असून दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नव्हती, असे शिवसेनेने म्हटले आहे.

भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमचे अध्यक्ष असुदोद्दीन ओवेसी यांनी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी दलित- मुस्लिम ऐक्याचे सूत्र मांडत आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे म्हटले होते. भारिप- एमआयएमच्या आघाडीवर सोमवारी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केली. दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. आता प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे एकत्र आले आहेत. हे दोघेही पूर्वी पडद्यामागून भाजपाच्या सोयीचे राजकारण करत होते. आता ते २०१९ मधील निवडणुकीत उघडपणे भाजपाला मदत करतील. ओवेसी- प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र येणे हे भारताच्या राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत, असे शिवसेनेने म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी देशभरातील दलित संघटनांना एकत्र आणण्याची गरज असताना त्यांनी ओवेसीशी हातमिळवणी केली. हे दलित समाजाला रुचेल काय?, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नव्हती, असेही अग्रलेखात म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव होते. ‘मुस्लिम धर्म स्वीकारा’ ही पाकिस्तानची ऑफर त्यांनी धुडकावून लावली होती. अशा महामानवास छोटा करण्याचे प्रयत्न त्यांचेच वारसदार करतात तेव्हा वाईट वाटते. ओवेसी यांचा एमआयएम हा पक्ष मुस्लिम लीगचा भ्रष्ट अवतार असून मुसलमानांच्या व्होट बँकेचे राजकारण करून देशात फुटीची बीजे रोवण्याचे काम त्यांनी सुरु केल्याचा आरोप शिवसेनेने केला.

प्रकाश आंबेडकर ओवेसीच्या तंबूत गेल्याने त्यांचा खरा चेहरा उघड झाला. ओवेसीची भाषा अस्थिरता आणि अराजक निर्माण करणारी असते. ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे का?, असा प्रश्नही शिवसेनेने अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + twelve =