पिंपळनेर – आषाढी एकादशी निमित्त विठुचा गजर… विठ्ठल विठ्ठल जय हारी…असं आपल्या लाडक्या विठुरायाचं नामघोष करीत उंभरे गावात पिंपळनेर येथील प्रचिती पब्लिक स्कूलच्यावतीने विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीत विठूरायाच्या गजरात पर्यावरण रक्षणाचा जागर करण्यात आला. विद्यार्थी दशेत पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी, याकरिता स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत भिमराव पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गावात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांची दिंडी क्षणभरासाठी स्थिरावल्यावर फुगडी –लेझीम यात दंग झाली. गावातून दिंडी पुढे आल्यावर वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी फेर धरून विठू नामाचा जयजयकार केला. विठू नामाच्या गजरात टाळच्या तालावर विद्यार्थी आणि टाळकऱ्यांनी मृदुंगावर पावले टाकत दिंडी पुढे निघाली. संत ज्ञानेश्वर,  तुकाराम,  मुक्ताबाई,  बहिणाबाई, जनाबाई,  नामदेव यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारली होती. ठिकठिकाणी गावातील महिलांसह ग्रामसेविक मनिषा बोरसे यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना शाळेच्या अभ्यासासोबत पर्यावरण संवर्धनाची आवड निर्माण व्हावी म्हणून शाळेच्या वतीने यंदाच्या वर्षापासून झाडे लावून त्याची जोपासना करण्यात येणार आहे. तर, वारीला न जाता वारीत सहभागी झाल्याचा अत्यानंद झाल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांनी दिली. दरम्यान, आषाढी एकादशीच्या निमित्ताने उंभरे गावाच्या ग्रामसेविक, स्कूलचे समन्वयक,  प्राचार्या तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. सुंदर अशा रांगोळी रेखाटनातून आषाढी एकादशीच्या ग्रामस्थांना शुभेच्छा देण्यात आल्या. पालखीच्या विसाव्यानंतर विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + fourteen =