चौफेर न्यूमज – आकुर्डी ः येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने ‘भूगोल सप्ताह’ उद्घाटन सोहळा पार पडला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे सदस्य व टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अर्जुन मुसमाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. चासकर, उपप्राचार्य डॉ. निलेश दांगट, भूगोल विभागप्रमुख डॉ. तुषार शितोळे, डॉ. सुचित्रा परदेशी, प्रा. रमेश गोपाळे. प्रा. तानाजी खरशिंगे, अशोक परंडवाल, निसर्ग राजा मित्र जीवांचे या संघटनेचे संयोजक राहुल घोलप यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. मुसमाडे यांनी मनोगत व्यक्त करताना या सप्ताहाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले, मानवी भूगोल आणि त्यातील येऊ घातलेल्या नवीन संकल्पना यांचा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनातून विचार होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा विकास हा शाश्‍वत दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन झाला पाहिजे. या पुढील काळात महाविद्यालयीन अभ्यासक्रम हे ज्ञानाचे उपयोजन करणारे असावेत, अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली.

या सप्ताहाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन हा आहे. या सप्ताहातील कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शन, पर्यावरणावर आधारित रांगोळी स्पर्धा, पाककला, मेहंदी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सामान्यज्ञान चाचणी, पालक मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी पोस्टर प्रदर्शनात 72 विद्यार्थी तर मेहंदी स्पर्धेत 18 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुषार शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरज नायक तर आभार नौशद बागवान यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 1 =