चौफेर न्यूज – गावातीलच एका दूध संकलन केंद्राच्या चेअरमनला शेतकऱ्याने घरात असलेल्या गाईची परवड होऊ नये म्हणून गाय विकून टाकली. ४० हजारात सौदा ठरला. पण विकलेल्या गाईचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला पैसे देण्याएवजी चक्क पेटवून देण्यात आले. पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली.

येवलवाडी येथील अश्रुबा दश्रथ नागरगोजे यांनी सततचा दुष्काळ आणि त्यातच होत असलेल्या नापिकीमुळे त्यांची गाय गावातीलच ओम दूध संकलन केंद्राचा चेअरमन भास्कर नागरगोजे याला ४ दिवसांपूर्वी विकली होती. खरेदीदारास व्यवहार ठरल्याप्रमाणे पैसे देणे बंधनकारक असल्यामुळे रविवारी सकाळी अश्रुबा नागरगोजे हे पैसे मागण्यास गेले असता एवढ्या सकाळीच पैसे का मागण्यास आलास? मी पैसे नाही देणार, असे चेअरमन म्हणाला. त्यावर आश्रुबा यांनी पैसे देणार नसाल तर मी गाई घेऊन जाईन, असे म्हटले. खरेदीदार आणि इतर तिघांनी यावरूनच अश्रुबा यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले. यात आश्रुबा गंभीररित्या जखमी झाले होते. बीडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. यात घटनेत तब्बल ८० टक्के भाजलेल्या अश्रुबा नागरगोजे यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

अश्रुबा यांना गाईचा खर्च झेपत नव्हता म्हणून त्यांनी भास्कर नागरगोजे याला गाय विकली होती. पण भास्कर याची नियती पैसे देताना फिरली आणि त्याने आपल्या अन्य ३ साथीदारांसह अश्रुबा यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. घटनेनंतर चारही आरोपी फरार झाले असून, पाटोदा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

14 − 4 =