चौफेर न्यूज – स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलेले भय्यू महाराज (उदयसिंह देशमुख) यांच्या पार्थिवावर बुधवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजयनगरस्थित मुक्तिधामात महाराजांची मुलगी कुहू हिने मुखाग्नी दिला. त्यांची पत्नी डॉ. आयुषी आणि आई मात्र आश्रमातच थांबल्या. मध्यप्रदेशातील कोणतेही बडे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रतिनिधी इंदूरला पाठवला. शिवसेनेचे एक खासदार व दोन आमदारही उपस्थित होते. दरम्यान, भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राचा दुसरा भाग बुधवारी समोर आला. त्यात त्यांनी आश्रम, मालमत्ता आणि आर्थिक अधिकारांची सर्व जबाबदारी निष्ठावंत सेवेकरी विनायक यांना सोपवल्याचा उल्लेख आहे.

ट्रस्टच कोट्याधवीची मालमत्ता, आलिशान गाड्या

भय्यूजींच्या सद्गुरु दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टची देशभरात अनेक कोटींची मालमत्ता आहे. महाराष्ट्रातच आश्रमाची २० पेक्षा जास्त केंद्रे आहेत. इंदुरात सूर्यादय आश्रमासह २ घरे, १० पेक्षा जास्त आलिशान गाड्याही आहेत.

 सुसाइड नोट, फोन कॉल्स, भेटणाऱ्यांची चौकशी

भय्यू महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीचा पोलिस बारकाईने तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी केलेले फोन, इंटरनेट डाटा, त्यांना भेटणाऱ्या लोकांची माहिती जमवली जात आहे.आत्महत्येच्या एक दिवस आधी मिठाईच्या दुकानात भय्यूजी एका महिलेला भेटले होते. याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले. मुलास शाळेत प्रवेश घ्यायचा असल्याने आपण भेटल्याचे त्या महिलेने सांगितले आहे.

असा आहे चिठ्ठीतील मजकूर

विनायक माझा विश्वासू आहे. माझे फायनान्स, मालमत्ता आणि बँक खात्यांची सर्व जबाबदारी विनायकवर असेल. हे मी कुणाच्याही दबावात येऊन लिहीत नाही.

 

२१ वर्षांपूर्वी दर्शनासाठी आला होता विनायक, नंतर मानसपुत्र बनला

अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील विनायक काशीनाथ दुधाडे (४३) हा २१ वर्षांपूर्वी महाराजांच्या दर्शनासाठी आला होता. नंतर तो सेवेकरी बनला. ट्रस्टच्या कामांत मदत करू लागला. महाराज कुणाला भेटतील, कुणाशी बोलतील हेही तोच ठरवायचा. महाराजांच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत विनायक सहभागी असायचा. विनायकचा शब्द हा भय्यूजी महाराजांचा शब्द मानला जात असे. महाराजांनी विनायकला मानसपुत्र मानले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − two =