चौफेर न्यूज – अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज (बुधवारी) इंदूर येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योदय आश्रम येथे भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येतील. दुपारी दीड वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे.

भय्यू महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथे राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सांगितले जाते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. ‘कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे’, असे त्यांनी नोटपॅडमध्ये लिहून ठेवले होते. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी यात नमूद केले होते.

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जातील. त्यापूर्वी सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत सुर्योद्य आश्रम येथे त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येतील. दुपारी १.३० वाजता होणार अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे.

देशभरातील विविध राज्यांमधील राजकीय नेते व चित्रपट अभिनेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे त्यांच्याकडे चर्चेसाठी जात असत. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोठे काम केले. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने ५०० तलाव खोदले आहेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते काहीही भेटवस्तू स्वीकारत नसत. त्याऐवजी एक झाड लावा, असे ते सांगत.

कौटुंबिक कलह किंवा नैराश्य या दोन कारणांनी त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. त्यांना नैराश्य आलेले होते. काही महिन्यापूर्वीच त्यांनी सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यातून आपण आता निवृत्त होत आहोत, असे जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 4 =