पिंपरी ः मुलगा दहावी पास झाल्यामुळे घरी पेढे घेऊन जाणाऱ्या एका शिक्षिकेवर  दुचाकीवरून आलेल्या दोघांनी  गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये शिक्षिकेला गोळी लागली नाही. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास एच ए कॉलनीतील शाळेसमोर घडली.

    शितल फिलिप सिकंदर (वय-35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या महिलेचे नाव आहे. सिकंदर या पिंपरीतील एका खासगी शाळेत शिक्षिका आहेत.  

    याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांनी माहिती दिली. शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल लागला. सिकंदर यांच्या मुलाने दहावीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत मुलगा चांगल्या गुणांनी पास झाला. शुक्रवारपासून मुलाच्या यशाचे कौतुक घरभर सुरु होते. एच ए स्कूल जवळ असलेल्या नाशिककर यांच्या दुकानात सिकंदर त्यांच्या एका मैत्रीणीसोबत दुपारी साडेबाराच्या सुमारास एच ए कंपनी वसाहतीमध्ये पेढे घेण्यासाठी आल्या.

    पावणेएकच्या सुमारास पेढे घेऊन पायी जात असताना पल्सर दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यातील एकाने शीतल यांच्यासोबत असलेल्या महिलेला बाजूला करून शीतल यांच्यावर पिस्टलमधून गोळी झाडली. पहिली गोळी शीतल यांना लागली नाही. त्यामुळे आरोपीने पुन्हा एक गोळी झाडली. सुदैवाने दुसरी गोळी देखील लागली नाही. दरम्यान, शीतल यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने आरोपी पसार झाले.  गोळीबारामुळे शीतल  बेशुद्ध पडल्या. त्यांना तात्काळ वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

    घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 5 =