चौफेर न्यूज : भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला आहे. मात्र या समितीमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर विशेष संपर्क अभियान समितीत मात्र एकनाथ खडसे यांच्यासह प्रकाश मेहता व शायना एनसी यांना स्थान देण्यात आलेले आहे.

निवडणूक जाहिरनामा समितीचे नेतृत्व ग्रामिण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर विजन डॉक्यूमेंट समितीच्या प्रमूखपदी पक्ष प्रवक्ता विश्वास पाठक यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक प्रचार रॅली आयोजनाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर परिषद आणि बैठकांच्या नियोजनाची जबाबदारी रामशिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच या बैठकीत पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी कायदेशीर प्रकरणे, साहित्य प्रचार, मत मूल्यांकन, निवडणूक संस्था, माहिती आणि जनसंपर्क, बुथ समन्वय आणि वॉर रुम मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या २२ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती व नियोजनासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, नितिन गडकरी, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधिर मुनगंटीवार आदी मंत्री उपस्थित होते. भाजपच्या समन्वय समितीमधूनही खडसे यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे नाराज झालेले खडसे या बैठकीला उपस्थित नव्हते.

भोसरीतील जमीन व्यवहार प्रकरणावरून एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रीपद गमावावे लागल्यानंतर खडसे यांना भाजपने दूरच ठेवले आहे. या वागणुकीबद्दल खडसे यांनी अनेकदा जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली आहे. आता लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी समन्वय समिती नेमण्यात आली असून या समितीमध्येही खडसे यांना स्थान दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नाराजीत अधिकच भर पडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + 12 =