चौफेर न्यूज – पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदीने ११ हजार कोटींना गंडा घातला असून त्याच बरोबर त्याने इतर देखील १७ बँकांना सुमारे ३ हजार कोटींचा चुना लावला आहे. विरोधक या प्रकरणावरून सरकारविरोधात बोलत असतानाच मित्र पक्ष असलेल्या शिवसनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली असून नीरव मोदीला आता रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा असा खोचक सल्ला उद्धव ठाकरे यांनी सामना या शिवसेनेच्या अग्रलेखातून दिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा दाखला देत मोदी सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहेत.

राज्यातील तसेच देशातील शेतकरी शे-पाचशे रुपये कर्जाचा हफ्ता फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करत आहे. जप्तीचा नांगर त्याच्या घरादारावर फिरतो पण बँकांची दीड लाख कोटींची लूट केली तरीही देशातील बनेल उद्योगपतीसुखरुप आहेत. जाहिरात बाजीवर सध्या देश चालला आहे. हजारो कोटींचा खर्च प्रसिद्धी आणि जाहिरातबाजी यावर सुरु आहे. रघुराम राजन यांनी सर्वांसमोर देशलुटीच्या कथा आणि दंतकथा आणल्या तेव्हा गव्हर्नर पदावरून त्यांना घालवण्यात आले. आता नीरव मोदीलाच रिझर्व्ह बँकेच्या चेअरमनपदी बसवा म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल.

विकासकामांसाठी हिंदुस्थानात पैशांची कमतरता नाही. पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने ११ हजार कोटींचा चुना लावला. हे महाशय चुना लावून कुटुंबासह पळून गेले. जानेवारीतच नीरव मोदीने देश सोडल्याचे समोर आले आहे. पण हे महाशय पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गेल्याच आठवड्यात दावोसमध्ये मिरवत होते. मोदी आणि यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपचा नीरव मोदी हा हमसफर होता आणि हे महाशय निवडणुकांसाठी पैसे जमा करण्यात आघाडीवर होते. अर्थात नीरवने इतका मोठा घोटाळा भाजप नेत्यांच्या आशीर्वादाने केला आणि बँकांची त्याने लूट केली भाजपच्या खजिन्यात त्यातला वाटा गेला असा आरोप आम्ही करणार नाही. पण असे अनेक नीरव मोदी भाजपची श्रीमंती वाढवण्यात आणि निवडणुकांसाठी पैशांचे डोंगर उभे करण्यासाठी झटत आहेत हे उघड आहे.

नीरव मोदी प्रकरणात न पंतप्रधान नरेंद्र मोदींची खाऊंगा ना खाने दुंगा ही घोषणा अपयशी ठरली आहे. नीरव मोदीबाबत पंजाब नॅशनल बँकेने तक्रार केली होती. हा माणूस तरीही दावोसला गेलाच कसा? बँक खात्यास नीरव मोदीचे आधार कार्ड लिंक केले असते तर काही गोष्टी उघड झाल्या असत्या. आधार कार्डाशिवाय सामान्य माणसाला स्मशानात लाकडेही मिळत नाहीत, रुग्णालयात प्रवेशही मिळत नाही. पण आधार कार्डाशिवाय नीरव मोदीने ११ हजार कोटींची लूट केली. ईडी वगैरेने नीरव मोदी विदेशात पळून गेल्यावर धाडी घातल्या. १८ ठिकाणी धाडी घालून ५१०० कोटी रुपयांचे दागिने जप्त केले असे समजले. अशा मालमत्ता विजय माल्ल्या आणि ललित मोदीच्याही आहेत पण तेही पसार झालेच आहेत.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मुंबईत आणि लालूप्रसाद पाटण्यात तुरुंगात आहेत पण कृपाशंकर यांचे भाग्य नीरव मोदींप्रमाणे चमकले असल्यामुळे ते भाजपकृपेने सुखरुप सुटले आहेत. डी एस कुलकर्णींचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. पण सरकारच्या नाकासमोरून माल्ल्या आणि नीरव मोदी पळून गेले आहेत . भाजपला २०१४ मध्ये निवडणुका जिंकून देण्यासाठी जे धनदांडगे उभे राहिले ते काय लायकीचे होते हे आता समोर आले आहे. तीन वर्षात देशासमोर भ्रष्टाचारमुक्त देश आणि पारदर्शक कारभार याची लक्तरे टांगली गेली आहेत. अशा भाषेत मोदी आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × three =