अजित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

शहरात गुन्हेगारी वाढली, स्मार्ट सिटीची ‘वेस्ट सिटी’ झाली

पिंपरी चिंचवड : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्या जोरावर महापालिकेतही सत्ता मिळाली. परंतू शास्तीकर आणि रेडझोनचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होऊनही शहरात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात होते. परंतू या शहराची ‘वेस्ट सिटी’ ह्या सत्ताधारी भाजपाने केली आहे. कचऱ्याच्या समस्येने त्रस्त होऊन भाजपाचेच नगरसेवक आता आंदोलन करत  असून सत्ताधारी भाजपाने पिंपरी चिंचवड शहराची वाट लावल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानिमित्त गुरुवार दि. १८ रोजी अजित पवार शहरात आले होते. त्यापूर्वी सांगवी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेता दत्ता साने, अजित गव्हाणे, राजू मिसाळ, मयूर कलाटे,  नाना काटे, पंकज भालेकर, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, फजल शेख उपस्थित होते.

रेडझोनचा प्रश्न अद्यापही प्रलंबित…

अजित पवार म्हणाले की , नरेंद मोदींच्या नावावर देशपातळीवर भाजपला बहुमत मिळाले. परंतु त्यांच्या नावाचा वापर करून राज्यात आणि महापालिकेत सत्ता मिळवूनही भाजपला आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही. रेडझोनचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. भाजपाने आता हा प्रश्न सोडवू असे सांगणे बंद करावे. निवडणुका जिंकण्यासाठी नागरिकांना खोटी आश्वासने देऊ नयेत. प्राधिकरणातील साडेबारा टक्क्याचा प्रश्न सुटला म्हणून यांनी जाहिरातबाजी केली. चौकाचौकात फलक लावले. मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न अद्यापही सुटला नसल्याची कबुली दिली. स्वच्छ भारतचा गाजावाजा केला, सेलिब्रिटी रस्ते झाडताना दिसले. स्वच्छता करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र गेल्या एक-दोन वर्षात पिंपरी चिंचवड शहराची काय अवस्था झाली? एकेकाळी ‘बेस्ट सिटी’ म्हणून या शहराची ओळख होती. आता संपूर्ण शहर कचरामय झाले आहे. भाजप नगरसेवकांनाच आता कचरा टाकून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असून बेस्ट सिटीची त्यांनी ‘वेस्ट सिटी’ केली आहे.

पदाधिकाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होतोय…

पिंपरी चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय केले म्हणून शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली. मात्र पोलीस आयुक्तालय होऊनही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजपच्या नगरसेविकेला जीवे मारण्याचा प्रयत्न होतोय. स्थायी सभापतींना जीवे मारण्याची धमकी दिली जातेयं. कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. त्यामुळे परदेशी कंपन्या शहरात थांबायला तयार नाहीत. माथाडीच्या नावाखाली काही संघटना दहशत माजवत आहेत. स्क्रॅप उचलण्यासाठी थेट मंत्रालयातून फोन येत आहेत. भंगार माफिया उदयास येत आहेत. वाहतुकीचा प्रश्न भाजपला सोडवता आला नाही. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर दिवसा-ढवळ्या हल्ला होतोयं. विरोधकांना टार्गेट केले जात आहे. हे सर्व सुरू असलेले प्रकार लोकशाहीला मारक आहेत, भाजपाकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप अजित पवार यांना केला.

 लोकसभेतील पराभवानंतर पार्थ विधानसभा लढवणार? अजित पवार म्हणतात…

लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यानतंर आता पार्थ पवार आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबतची चर्चा सुरू झाली. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल. हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या पक्षात बळजबरी करत नाही,’ असं म्हणत अजित पवार यांनी पार्थच्या विधानसभा लढवण्याबाबत थेट भाष्य करणं टाळलं आहे.  ‘लोकसभेतील पराभव आम्ही स्वीकारला असून आम्हाला जनतेचा कौल मान्य आहे. आता विधानसभेच्या तयारी सुरू झाली आहे,’ असंही अजित पवार म्हणाले. ‘विधानसभा जागा वाटपाबाबत आघाडीत फार काही अडचण येणार नाही. सकारात्मक चर्चा झाली आहे. काही जागांची अदला-बदल होईल,’ अशी शक्यता अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

भाजपने किती तरुणांना नोकऱ्या दिल्या….

अनावश्यक कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यामुळे राज्यावर साडेचार लाख कोटी कर्जाचा बोजा वाढला आहे. तरी देखील सरकार राज्यात औद्योगिक पार्क तयार करण्याची घोषणा करत आहे. मेक इन, स्कील इंडियाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमध्ये किती उद्योग सुरू केले?. किती तरुणांना नोकऱ्या दिल्या?. या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यानंतर औद्योगिक पार्कच्या गोष्टी करा, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या सरकारला सुनावले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासने…

अजित पवार म्हणाले की, पारदर्शकतेच्या नावाखाली देशात भाजप सरकार आले. दोन कोटी तरुणांना नोकरी देणार होते. आज भाजपच्या नेत्यांनी किती तरुणांना नोक-या दिल्या हे सांगावे. त्यानंतरच औद्योगिक पार्क करण्याची गोष्ट करावी. गेल्या तीन वर्षांपासून कर्जमुक्तीची घोषणा केली जाते. हे सरकार एकाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू शकले नाही. आता पुन्हा सरकारने 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत कर्जमाफी करण्याचे नवीन आश्वासन दिले आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारने हे आश्वासन दिले आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांचेच मंत्री आहेत. तरी, मुंबईतील बांद्रा येथे शिवसेनेने विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढला. सत्ता तुमची, अधिकार तुमच्या हातात असताना मोर्चा काढण्याची गरजच काय आहे. विमा कंपन्यांना बोलवून घ्या, त्यांना खडसावून सांगवून तसे आदेश द्या, बघू कसा विमा मंजूर होत नाही, अशीही डरपोक्ती पवार यांनी सरकारला दिली.

उत्पादन घसरणीवर भाजप नेत्यांचा ब्र देखील निघत नाही

सध्या सरकारच्या विरोधात सक्षम फळी तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राज्यातील औद्योगिक उत्पादनाचा दर 3.1 पर्यंत घसरला आहे. यावर भाजपचे नेते ब्र देखील काढत नाहीत. तसेच, तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचं सांगितलं जातं. लोकांच्या पचनी पडेल एवढंच खोटं बालावं. किती खोटंय बोलायचं त्याला पण मर्यादा असते. मुंबईत इमारत कोसळून अनेकांचे प्राण गेले. पुण्यात भिंत कोसळून अनेकजण मृत्यूमुखी पडले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या नावाखाली दिशाभूल केली जात असल्याचा आरोप देखील पवार यांनी सरकारवर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + five =