चौफेर न्यूज –  केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जनतेत असंतोष पसरलायं. ज्या विश्वासाने लोकांना ४ वर्षापूर्वी सत्तेत बसवले होते, त्याचा भ्रमनिरास झाला आहे. महागाई, पेट्रोल दरवाढ, कोणतेही आश्वासन पूर्ण न झाल्याने भाजपा विरोधात लोकांमध्ये नाराजीचा सूर वाढला असल्याचे भंडारा-गोंदियाच्या पोटनिवडणूकीच्या निकालावरून दिसत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते शहरात आले होते. त्यानंतर भोसरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, दीपक मानकर आदी उपस्थित होते.

राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेमध्ये अतिशय प्रेमाचे संबध आहेत. हे आपण दररोज पाहत आहोत. पालघरमधील शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते काही तरी घोषण करतील असे सर्वांना वाटले होते. परंतु, तसे झाले नाही. त्यांनी ‘ईव्हीएम’ मशिनलाच दोष दिला. त्यांना आत्ता सत्ता सोडयचीच नसेल, शेवटच्या ४ महिन्यात त्यांचे प्रेमाचे संबंध संपतील असा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

भंडारा-गोंदिया निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ‘ईव्हीएम’ मशिनचा मोठा फटका बसला आहे. आमचे हक्काचे मतदार मतदान न करता मशिन बंद असल्यामुळे परत गेले. नाहीतर, आम्हाला आणखीन मताधिक्य मिळाले असते. पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. त्यांचा परिणाम निकालातून दिसून येत आहे. पालघरमध्ये भाजपची आणि विरोधकांच्या मताची आकडेवारी पाहिली असता विरोधकांची मते जास्त आहेत. यावरूनच भाजप विरोधात लोकांमध्ये असलेला असंतोष दिसून येत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × one =