चौफेर न्यूज – राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आवडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. देशात झालेल्या लोकसभेच्या १० जागांसाठीच्या पोटनिवडणुकांत भाजपाला ९ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. या मुद्द्यावरून बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

पवार म्हणाले, विरोधकांनी सामान्य नागरिकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात तसेच भाजपाप्रणित सरकारविरोधात एकत्र यायला हवे. दरम्यान, सर्व विरोधकांना एकत्र आणण्यास आपल्याला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. जे भाजपाविरोधात आहेत, ज्यांचा लोकशाही आणि समान हक्कांवर विश्वास आहे त्यांनी गांभीर्याने एकत्र येण्याबाबत विचार करायला हवा असेही पवार यांनी म्हटले आहे. यासाठी सर्व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याच्या प्रक्रियेत सामिल होण्यास मला आवडेल. तसेच त्यामुळेच भाजपाविरोधात एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी यावेळीे आवर्जुन सांगितले.

१९७७मध्ये एका पक्षाचा पडता काळ सुरु झाला होता, त्यामुळे त्यांचे सरकारही कोसळले होते. सर्व विरोधक एकत्र आले तर, यासारखीच स्थिती आत्ताही निर्माण होऊ शकते, अशा शब्दांत शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत भाजपाचा पराभव निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

फेब्रुवारी महिन्यांत शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा करताना काँग्रेससाठी अच्छे दिन येणार असल्याचे सुचित केले होते. दरम्यान, त्यांनी नुकतेच कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला सर्व विरोधकांसह हजेरी लावली होती.

मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काहीही करीत नाही. त्यामुळेच त्यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे. समाजाने या काळात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहायला हवे असे आवाहन पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + twenty =