चौफेर न्यूज –  श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे मालिकेत सूर सापडलेल्या महेंद्रसिंह धोनीचे वीरेंद्र सेहवागने कौतुक केले आहे. सध्या भारतीय संघात धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. २०१९ च्या वर्ल्ड कपनंतरच धोनीला पर्याय शोधावा लागेल असे सेहवागने म्हटले आहे.

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ‘पीटीआय’या दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीविषयी भाष्य केले. सध्या भारतीय संघात कोणीही धोनीची जागा घेऊ शकत नाही. ऋषभ पंत हा चांगला खेळाडू आहे. पण धोनीची जागा घेण्यासाठी त्याला वेळ लागेल. २०१९ च्या वर्ल्डकपनंतरच आपण धोनीसाठी पर्याय शोधला पाहिजे. तोपर्यंत ऋषभ पंतला अनुभवही येईल असे सेहवागने सांगितले. संघात मधल्या आणि खालच्या फळीत खेळण्याचा धोनीसारखा अनुभव कोणत्याही फलंदाजाकडे नाही. आता धोनी २०१९ च्या वर्ल्डकपपर्यंत फिट राहू दे अशी प्रार्थना आपण केली पाहिजे असेही त्याने नमूद केले.

‘आयुष्याप्रमाणेच तुमच्या खेळातही चढउतार येतात. तुम्ही कधी धावांचा पाऊस पाडता तर कधी धावांचा दुष्काळ असतो. तुम्ही या परिस्थितीचा सामना केला पाहिजे. व्यवसायात तुम्ही दरवर्षी नफाच कमवाल असे होत नाही’ असे सेहवागने आवर्जून सांगितले. धोनीनंतर संघात कायमस्वरुपी यष्टीरक्षक नेमण्याची गरज असल्याचे सेहवाग सांगतो. वन डे सामना आयपीएलमधील टी-२० मॅचसारखा नसतो. एक स्टम्पिग किंवा झेल सामन्याचे चित्र बदलू शकतो असे त्याने सांगितले. मधल्या फळीतील फलंदाजांना वर्ल्ड कपपूर्वी पुरेशी संधी दिली पाहिजे. दबावाखाली खेळण्यासाठी ते तयार झाले पाहिजे असे सेहवागचे म्हणणे आहे. मधल्या फळीत धोनीचे स्थान कायम ठेवले पाहिजे. तर केदार जाधव, मनिष पांडे यांनादेखील संधी दिली पाहिजे असे मत त्याने मांडले. श्रीलंकेतील वन डे मालिकेसाठी संघाची घोषणा केल्यानंतर निवड समितीचे प्रमुख एम.एस.के.प्रसाद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धोनीविषयी सूचक विधान केले होते. धोनीबद्दल अंतिम निर्णय घेण्याआधी तो आगामी सामन्यांमध्ये कसा खेळतो हे आम्ही बघू, यानंतर वर्ल्डकपमध्ये कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले होते.’ धोनी हा आमच्यासमोरचा एकमेव पर्याय नाही. ऋषभ पंतच्या कामगिरीवरही आमचं लक्ष आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सेहवागने केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − ten =