चौफेर न्यूज

चीन व भारत यांच्यातील पेचप्रसंगात अमेरिका व इतर देश उगाचच भर टाकत असून, यात ‘दक्षिण चीन सागरा’सारखे डावपेच त्यांना येथेही खेळायचे आहेत असे यातून दिसते, अशी खरमरीत टीका चीनच्या ‘दी ग्लोबल टाइम्स’या सरकारी वृत्तपत्राने केली आहे. १९६२च्या भारत-चीन युद्धास अमेरिका व सोविएत रशिया हेच जबाबदार होते, असा आरोप या लेखात केला आहे.

या वृत्तपत्राच्या संपादकीय पानासमोरील पानावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात म्हटले आहे, की भारत व चीन यांच्यात सीमेवर गेले पाच आठवडे पेच सुरू आहे. यात भारत-चीन वगळता इतर काही देशांनी थेट हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यात ऑस्ट्रेलिया व अमेरिका यांचा समावेश आहे.

‘इन्स्टिगेटिंग सिनो-इंडियन कन्फ्रंटेशन वोन्ट बेनिफिट यूएस’ या लेखात म्हटले आहे, की अमेरिकी माध्यमांनीही यात भारताला पाठिंबा देऊन चीनचा मुकाबला करावा असा अनाहूत सल्ला दिला आहे. चीन विरोधात जागतिक पातळीवर मोर्चेबांधणीचा हेतू यात दिसतो आहे.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी डोकलाम प्रश्न शांततेने सोडवावा असा सल्ला दिला आहे. त्यालाही आक्षेप घेण्यात आला असून या लेखात म्हटले आहे, की बिशप यांनी अप्रत्यक्षपणे भारताला पाठिंबा दिला आहे. त्यांनी या पेचप्रसंगाचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला.

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिका भारत यांच्यातील व्यापार व स्थलांतर प्रश्नात लक्ष घालण्याऐवजी भलतीकडेच लक्ष घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. दक्षिण आशियातील डावपेच येथेही यशस्वी होतील असे अमेरिकेला वाटत असले तरी अशा सागरी वादातून तरी अमेरिकेला काय मिळणार आहे हे समजत नाही. अमेरिकेने चीन-भारत संघर्षांत हस्तक्षेप करून त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्याचा फायदा होणार नाही.

अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे चीन आपल्या भूमीचे रक्षण करणे सोडणार नाही. जिथे कुठे वाद होता तेथे हमखास अमेरिका नाक खुपसते व त्यात निष्पक्ष भूमिका कधीच घेत नाही. चीन व भारत यांच्यात सशस्त्र संघर्ष व्हावा यासाठी पश्चिमेकडील काही शक्ती काम करीत आहेत. त्यात काही न गमावता फायदा घेता येईल असे त्यांना वाटते आहे. दक्षिण चीन सागरात इतरांना चिथावणी देऊन अमेरिका आता तेच करीत आहे. १९६२च्या भारत-चीन युद्धास अमेरिका व सोविएत रशिया हेच जबाबदार होते त्यांचा अदृश्य हात होता. चीन व भारत यांना कधीच युद्ध नको होते व नको आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 1 =