चौफेर न्यूज –  ‘मेक इन इंडिया’ मोहीमेअंतर्गत भारताला शस्त्रास्त्रनिर्मितीत अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. भारताला शस्त्रास्त्रांसाठी अजूनही दुसऱ्यांवर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. २०१३ ते २०१७ या कालावधीत शस्त्रास्त्रांची सर्वाधिक आयात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. जगातील शस्त्रास्त्रांच्या एकूण आयातीपैकी १२ टक्के आयात एकटा भारत करतो.

इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (आयपीआरआय) या संस्थेने सोमवारी जगभरातील देशांकडून होणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात २००८ ते २०१२ च्या तुलनेत २०१३ ते २०१७ या कालावधीत भारताच्या शस्त्रास्त्रांच्या आयातीमध्ये  लक्षणीय वाढ झाली आहे. भारत जगभरात शस्त्रास्त्रांची आयात करणाऱ्या देशांमध्ये अव्वल स्थानी आहे. भारताच्या पाठोपाठ सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानी आहे. तर इजिप्त, संयुक्त अरब अमिरात हे देश अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. चीन, ऑस्ट्रेलिया हे देश पाचव्या व सहाव्या स्थानी आहे. तर अल्जेरिया सातव्या, इराक आठव्या आणि पाकिस्तान नवव्या स्थानी आहे.

भारत जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार देश असून भारतातील ६२ टक्के शस्त्रास्त्रे हे रशियाकडून येतात. तर अमेरिकेकडून १५ टक्के आणि इस्रायलकडून ११ टक्के शस्त्रास्त्रांची खरेदी करण्यात आली आहे. रशिया आणि इस्रायलकडून भारत नेहमीच शस्त्रास्त्रांची खरेदी करत आला असला तरी अमेरिकेकडून निर्यातीचे प्रमाणही वाढले आहे. चीनला शह देण्यासाठी अमेरिका- भारतामधील संबंध सुधारत असून संरक्षण क्षेत्रात अमेरिकेचे योगदान वाढल्याचे सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 4 =