चौफेर न्यूज –  कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. एका गुन्ह्यात चोरीस गेलेल्या ३२ शेळ्यांचा शोध भोसरी पोलिसांनी लावला आहे. मात्र न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत आता त्यांच्यावर शेळ्या सांभाळण्याची वेळ आली आहे.

दिनकर नामा काळे (वय ७८, रा. कचरा डेपोजवळ, कॅन्टोमेंट चाळ, कासारवाडी) यांच्या ११ बकऱ्या बुधवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास चोरीस गेल्या. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर भोसरी पोलिसांनी तपासाला सुरवात केली. मात्र याच परिसरातून चोरीला गेलेल्या तब्बल ३२ शेळ्या पोलीसांना आरोपीकडे सापडल्या.

आसपासच्या परिसरात शेळ्या चोरणाऱ्या व्यक्‍तींबाबत माहिती घेतली असता खडकी येथील एका आरोपीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता चार जणांनी शेळ्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले असून चोरलेल्या ११ बकऱ्याही हस्तगत केल्या. आखाड महिन्यात मटणाला जादा मागणी असल्याने आरोपींनी या बकऱ्या चोरल्या. रस्त्याने जाताना शेळ्या नजरेस पडतील या भीतीने आरोपींनी रेल्वे ट्रॅकवरून या शेळ्या नेल्या.

भोसरी पोलिसांनी चोरलेल्या शेळ्या हस्तगत करून पोलिस ठाण्यात आणल्या खऱ्या मात्र त्यांच्या खाण्या-पिण्याचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला. भोसरी पोलिसांनी या सर्व शेळ्या कचरा डेपोजवळ, कॅन्टोमेंट चाळ, कासारवाडी येथे दिनकर नामा काळे यांच्या घरासमोर ठेवल्यात. पोलिस सध्या त्यांची राखण करीत आहेत. न्यायालयाचा आदेश येईपर्यंत चोरीचा हस्तगत केलेला हा मुद्देमाल पोलिसांना सांभाळावा लागणार असल्याने त्यांच्यावर शेळ्या संभाळण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × five =