चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाच्या पुढा-यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मनपाची तिजोरी मोकळी करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. करदात्या नागरीकांच्या पैशाची लूट आणि सावळा गोंधळ रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरखास्त करावी. अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत साठे बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कडून पृथ्वीराज साठे, संग्राम तावडे, शानी नौशाद यांची प्रदेश सदस्य आणि भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत भिकाजी नेवाळे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब वामनराव साळुंके आणि चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम शंकर गुंजाळ यांची निवड झाल्याचे जाहिर केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, माजी महापौर कविचंद भाट, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, एन्‌एसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे आदी उपस्थित होते.

साठे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहर कॉंग्रेस विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनतेच्या वतीने पिंपरी चिंचवड मनपा बरखास्तीची मागणी आम्ही करणार आहोत. या बाबतचा निर्णय ताबडतोब घ्यावा व जनतेच्या पैशाची लूट थांबवावी. मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी समिती नेमण्याचा फार्स करु नये. कारण मुख्यमंत्री हे भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालतात हे वेळोवेळी सिध्द झाले आहे. मुख्यमंत्री हे ‘क्लीन चिटर’ मुख्यमंत्री असल्याची टिका साठे यांनी केली. पिंपरी चिंचवड मनपात विरोधी पक्षाचे अस्तित्व नाही. शिवसेना चोरी झाली म्हणून विरोध करते का चोरीमध्ये वाटा मिळाला नाही म्हणून विरोध करते असा प्रश्न करदात्या नागरीकांना पडला आहे. त्यामुळे शिवसेनेचा विरोध संशयास्पद आहे. भाजपाचे केंद्रापासून मनपा पर्यंत बहुमत आहे. त्यामुळे त्यांना लोकप्रतिनिधींची व जनतेच्या भावनांशी अनादर करण्याची सवय झाली आहे. त्यामुळेच खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. पिंपरी चिंचवड मनपात भाजपाचेच नगरसेवक प्रवेशव्दारासमोर फ्लेक्स फेकतात त्यांच्या नेत्यांचे आदेश पाळत नाहीत आणि त्यांचे नेते देखील अशा लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत. अनाधिकृत बांधकामांवरील कारवाई नुसता दिखावा आहे. विशालनगर, वाकड येथील दारुचे दुकान भाजपाशी संबंधित व्यक्तीचे असल्यामुळे त्यावर कारवाई केली जात नाही. तर सर्व सामान्य जनतेच्या घरावर हातोडा मारला जात आहे. त्यांच्या कारवाईच्या त्रासातून एका महिलेने आत्महत्या केली अशा किती महिलांना जीव गमवावा लागेल. पाणी पट्टीतील दरवाढ झाकण्यासाठी 6 हजार लिटीर मोफत पाणी प्रत्येक कुटूंबाला दिल्याचे भांडवल करतात. स्वतंत्र पोलिस आयुक्तालय, शास्तीकर असे अनेक प्रश्न प्रलंबित असून वाकड मधील सीमा भिंतीत देखील यांनी भ्रष्टाचार केला. विकास कामांच्या निवीदा भरताना ठेकेदारांशी संगनमत करुन रिंग केली. याबाबत त्यांच्याच पक्षाचे खासदार प्रतिनिधी तक्रार करीत आहेत. मेट्रोचे ते भांडवल करतात. मेट्रोचा प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करण्याची ही भाजपाची पध्दत जनतेला खाईत लोटणारी आहे. निवडणुकी पुर्वी कथीत भ्रष्टाचाराचा मुद्दा पुढे करुन जनतेची दिशाभूल करुन सत्ता मिळविली. भ्रष्टाचा-यांना तुरुंगात पाठवू म्हणणा-यांनी त्यांनाच पक्षात घेतले. अशीही टिका सचिन साठे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − 2 =