पिंपरी :  कष्टकरी कामगारांना आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा लागत आहे. सध्या सत्ताधाऱ्यांकडून कामगारांना फक्त आश्वासने दिली जात आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने रिक्षाचालक, मोलकरीण, फेरीवाल्यांनी राज्यातील दहा महापालिकांची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवण्यात याव्यात, असा ठरावही पिंपरीत आयोजित करण्यात आलेल्या ‘र्निधार परिषद’मध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

कष्टकरी कामगार पंचायतच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य आत्रे सभागृहात र्निधार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य व श्रमिक मुक्तीदलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेचे उद्घाटन विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कष्टकरी कामगार पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे,  पँथर पॉवर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड (नांदेड), नाना क्षीरसागर (पुणे),  मधुकर थोरात (रायगड), गफार नदाफ (कराड), महेश चौगुले (सांगली), आनंद चौरे, रवी तेलरंदे (नागपूर) बाळू फाळके, महिपत पवार, तानाजी मसलकर, राजू सिधगणे (सोलापूर)  आशा कांबळे (पिंपरी-चिंचवड), विठ्ठल गायकवाड (पुणे) तसेच राज्याच्या विविध भागातील कष्टकरी कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भाई वैद्य म्हणाले की, सध्याचे सरकार हे गोरगरीब आणि कष्टकरी कामगारांच्या विरोधात आहे. कष्टकऱ्यांना रोजचे जगणे मुश्कील झाले असतानाच नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या निवडणुकीत कष्टकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या व्यक्तीला सत्तेत पाठवावे.

बाबा कांबळे म्हणाले की, घरकुलधारक, रिक्षाचालक, टपरीधारक, हातगाडी, पाथारी व्यावसायिक यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध अनेकवेळा आंदोलने केली. लढा दिल्याशिवाय काहीच मिळत नाही. कष्टकरी कामगार पंचायतने आजपर्यंतच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नाही. येत्या निवडणुकीत कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे.

आशा कांबळे, विलास भालेराव, नरेंद्र गायकवाड यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. या परिषदेत पंधऱा ठराव मंजूर करण्यात आले. रिक्षाचालक ते हॉटेलमालक असा प्रवास केलेल्या बशीर सय्यद यांना आदर्श उद्योजक, मौलाना सय्यद यांना सामाजिक सलोखा पुरस्कार, शंकरराव तायडे यांना समाज भूषण,  संतोष जोगदंड यांना मानवतावादी कार्यकर्ता पुरस्कार, माया सावंत यांना रणरागिणी पुरस्कार तर धर्मराज जगताप आणि बळीराम काकडे यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रल्हाद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. बळीराम काकडे यांनी आभार मानले. बाळासाहेब ढुंबरे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश शिंदे, संभाजी गोरे, गणेश अहेर, सुदाम बनसोडे, विनोद वरखडे, सोमनाथ कलाटे, विकी तामचीकर, सदाशिव तळेकर, शोभा शिंदे, मिनू गिल आदींनी संयोजन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × 5 =