धुळे  : महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी सुरु केलेले कामबंद आंदोलन चिघळले असून आयुक्तांनी २८० आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली आहे तर कर्मचारी समन्वय समितीचे निलंबित उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध मागण्या व निलंबित कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. याचदरम्यान शनिवारी आयुक्त संगीता धायगुडे यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी कर्मचार्‍यांची उपस्थिती आढळून आली नाही. त्यानंतर आंदोलनकर्त्यांना नोटीस बजाविण्यात आली. महापालिका कर्मचारी समन्वय समितीला शासन मान्यता नाही.

त्यामुळे कामबंद आंदोलन कायदेशीर धरता येणार नाही, असा ठपका प्रशासनाने ठेवला. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांना चर्चेसाठी बोलाविले होते. आठ ते दहा दिवसात जाधव यांच्या निलंबनाबाबत निर्णय घेवू. मात्र, कामबंद आंदोलन मागे घ्या, अशी भूमिका प्रशासनाने घेतली.तर आयुक्तांनी जाधव यांच्या निलंबनासंदर्भात लेखी आश्‍वासन न दिल्यामुळे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार संघटनेने घेतला आहे.

यामुळे आयुक्त संतप्त झाल्या व त्यांनी आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व कर्मचार्‍यांची यादी पोलिस ठाण्यात द्या, दि.१७ व १८ फेब्रुवारीची विनावेतन रजा धरण्यात येईल, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

दरम्यान, रात्री उशिरा प्रभारी सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन प्रसाद जाधव यांच्याविरुध्द भादंवि ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्या दि.२० फेब्रुवारी रोजी आंदोलन मागे घ्यायचे की सुरुच ठेवायचे याबाबत समन्वय समिती निर्णय घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − four =