पिंपरी ः  महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त उद्या, गुरुवारी (दि. 11) सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत पिपरी-चिंचवड शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. सकाळी नऊ वाजता भक्ती शक्ती शिल्प-निगडी येथुन दुचाकी रॅलीला सुरुवात होईल. ही रॅली भेळचौक, संभाजी चौक, निगडी प्राधिकरण म्हाळसाकांत हायस्कुल चौक, आकुर्डी गावठाण, खंडोबामाळ चौक, आकुर्डी दळवीनगर चिंचवड चापेकर चौक गांधी पेठ चिंचवड गांव, भीमनगर चौक, लिंक रोड अहिल्यादेवी पुतळाचौक, मोरवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे निघून पिंपरीतील महात्मा फुले पुतळा येथे या दुचाकी रॅलीचा समारोप होईल.
या दुचाकी रॅलीचे आयोजन विविध समविचारी संघटना, मंडळ यांचे सहकार्याने संयुक्तरित्या केलेले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम
पिंपरी चिंचवड ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 11 ते 14 एप्रिल 2019 या कालावधीत पिंपरी येथे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे गुरुवारी (दि.1) महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता प्रबोधन पर्वाचे उद्घाटन होणार आहे.
या प्रबोधनपर्वा अंतर्गत विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (दि. 11) सकाळी दहा वाजता धीरज वानखेडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. दुपारी एक वाजता जयराम जाधव यांचा ‘भीम के दिवाने’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चार वाजता चित्रसेन भवार यांचा प्रबोधनात्मक महात्मा फुले यांना अभिवादन कार्यक्रम सादर होणार आहे. सायंकाळी सहा वाजता डॉ. बबन जोगदंड व प्रा. प्रभाकर ओव्हाळ यांचे व्याख्यान तर रात्री आठ वाजता गणेश इनामदार यांचा महात्मा फुले यांच्या जीवनावरील नाटयप्रयोग सादर होईल.
शुक्रवार (दि. 12) सकाळी दहा वाजता सागर यल्लाळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी एक वाजता महेंद्र सावंग यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर सांयकाळी चार वाजता विश्‍वजीत शिंदे यांचा भीम जल्लोष ‘ऑर्केस्ट्रा’, सायंकाळी सहा वाजता क्रांती खोब्रागडे, उपायुक्त आयकर विभाग पुणे यांचे – भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांविषयक कार्य/धोरण या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान होईल. तर, रात्री आठ वाजता विजयकुमार गवई यांचा ‘वुई द पिपल’ हा संगीतमय नाटयप्रयोग सादर होणार आहे.
शनिवार (दि. 13) सकाळी दहा वाजता संगीत विशारद हरीष दळवी व सारिका गायकवाड यांचा ‘भीमवाणी’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. दुपारी बारा वाजता आदेश आटोटे यांचा ‘मजबूत भीमाचा किल्ला’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. दुपारी तीन वाजता डॉ. दीप चहांदे, नागपूर यांचा ‘असा झालाच ना कोणी’ प्रबोधनात्मक कार्यक्रम सदर होईल. सायंकाळी पाच वाजता जल आणि उर्जा संशोधन केंद्र खडकवासला पुण्याचे ग्रंथालय व माहिती अधिकारी डॉ. डी. टी. गायकवाड यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जल व उर्जा क्षेत्रातील कार्य या विषयावर व्याख्यान होईल. सायंकाळी सहा वाजता मुंबई विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख डॉ. कुणाल इंगळे व ऋतिका बोरकर यांचा ‘गाथा महापुरुषांची’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम तर रात्री साडेआठ वाजता प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांचा ‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ हा नाटयप्रयोग सादर होणार आहे.
रविवार (दि. 14) सकाळी सहा वाजता प्रसिद्ध गायक भूपेंद्र सवई नागपूर यांची ‘निळी पहाट’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे. सकाळी नऊ वाजता कुणाल कांबळे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होईल. सकाळी दहा वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. सकाळी सव्वादहा वाजता महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे.
त्यानंतर सकाळी अकरा वाजता गौरव महाराष्ट्राचा फेम स्वप्नील पवार, संकल्प गोळे व शेखर गायकवाड यांचा ‘त्रिवार अभिवादन’ प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार असून दुपारी एक वाजता प्रसिध्द गीतकार, संगीतकार, गायक व प्रबोधनकारक प्रभाकर पोखरीकर यांचा ‘जिवाला जिवाच दान अर्थात भीमशाही’ हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी तीन वाजता प्रसिध्द गायिका उर्मिला धनगर, विशाल चव्हाण व साजन बेंद्रे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. सांय साडेपाच वाजता कुणाल वराळे यांचा ‘युग पुरुष’ हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार असून रात्री नऊ वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिध्द पंजाबी गायिका गिन्नी माही यांचा प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम होऊन प्रबोधन पर्वाची सांगता होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 11 =