भाजप नगरसेविका माया बारणे यांचा हल्लाबोल

पिंपरी चिंचवड : महापालिकेतील नगरसेवकांच्या अधिकारांवर महापौर राहुल जाधव गदा आणत आहेत. महासभेत लेखी प्रश्‍न विचारण्याचा नगरसेवकांना अधिकार असताना महापौरांकडून लेखी प्रश्‍न स्वीकारले जात नाहीत, असा आरोप भाजप नगरसेविका माया बारणे यांनी केला. तसेच अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी महापौर विरोधकच नव्हे तर स्वपक्षिय नगरसेवकांचीच गळचेपी करत असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला. महापालिकेत माया बारणे यांनी सोमवारी पत्रकार परिषेद घेत महापौर, प्रशासनावार हल्लाबोल केला. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक नामदेव ढाके उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक म्हणून माया बारणे यांना ओळखले जाते. तर, आमदार महेश लांडगे यांचे महापौर राहुल जाधव समर्थक आहेत. आमदारांच्या दोन्ही समर्थकांमध्ये जुंपल्याने याची महापालिका वर्तुळात जोरदार रंगली आहे.

लेखी प्रश्‍न विचारण्याचा अधिकार…

माया बारणे म्हणाल्या, झोपडपट्टी पुनर्वसन, पंतप्रधान आवास योजना, सल्लागारांबाबत, निविदा न मागविता थेट पद्धतीने दिलेल्या कामांबाबत लेखी प्रश्‍न महापौरांकडे घेण्याची मागणी केली होती. तथापि, महापौर राहुल जाधव यांनी प्रश्‍न स्वीकारले नाहीत. महापौर म्हणतात महासभेत प्रश्‍नांवर थेट चर्चा केली जाईल. परंतु, प्रश्‍न स्वीकारले जाणार नाहीत. महासभेत लेखी प्रश्‍न विचारायचा नगरसेवकांना अधिकार आहे. तोंडी चर्चेला उत्तर देण्यास अधिकारी बांदील नसतात. लेखी प्रश्‍न विचारल्यास अधिकार्‍यांना लेखी उत्तरे देणे बंधनकारक असते. त्यामुळे शहरातील प्रश्‍नांवर सकारात्मक चर्चा होते. त्यातून शहरातील प्रश्‍नांचे वास्तव समोर येते.

पालिका आयुक्त निष्क्रीय…

महापौरांना प्रश्‍न स्वीकारण्यासाठी कशाची भिती वाटते? असा सवाल उपस्थित करत बारणे म्हणाल्या, महापौर जाधव कुठेतरी अधिकार्‍यांना वाचवत आहेत. प्रश्‍नांची लेखी उत्तरे देता येऊ नयेत, यासाठीच महापौर प्रश्‍न घेत नाहीत. पक्षाच्या पार्टी मिटिंगमध्ये देखील बोलू दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रश्‍न स्वीकारल्यास विरोधक देखील त्यावर सकारात्मक चर्चा करतील. चांगल्या गोष्टीला ते देखील विरोध करणार नाहीत. तेही शहराचे नागरिक आहेत. महापौर प्रश्‍न स्वीकारत नाहीत अन् आयुक्त उत्तरे देत नाहीत. अधिकारी उडवाउडवीची माहिती देत असल्याची हतबलताही त्यांनी बोलून दाखविली. आयुक्त श्रावण हर्डीकर निष्क्रिय असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अनधिकृत बांधकाम, पाणी टंचाईवर न बोलण्याचा सल्ला…

शहरात पाणी गळती आणि अनधिकृत नळ कनेक्शन रोखण्यास पाणी पुरवठा विभागाला अपयश आले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा बांधकाम अधिकार्‍यांनी बाऊ केल्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावली आहेत. यावर भाजप नगरसेवक नामदेव ढाके महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत होते, परंतू, महापौरांनी त्यांना तुम्ही सुचना मांडा, अनधिकृत बांधकाम, पाणी टंचाईवर बोलू नका, अशा सुचना दिल्या.  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव होते. महापालिकेच्या सभेत चार विषय समित्यांची सदस्य पदावर नगरसेवकांच्या निवडी करण्यात आल्या. त्यानंतर नगरसेवक नामदेव ढाके यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामासह पाणी टंचाईवर भाष्य केले. महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला. त्यानंतर महापौर राहूल जाधव यांनी तुम्ही अनधिकृत बांधकाम आणि पाणी टंचाईवर बोलू नका, तुम्ही लवकरच सुचना मांडा, असे सांगून त्यांना त्या प्रश्‍नावर बोलण्यास थांबविले. त्यामुळे अनधिकृत बांधकाम आणि पाणी टंचाई प्रश्‍नावर अन्य नगरसेवकांना बोलायचे होते. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

 आत्तापर्यंत कोणाचेही प्रश्‍न घेतले नाहीत. आचारसंहिता लागू आहे. आचारसंहिता उठल्यानंतर प्रश्‍न स्वीकारण्याबाबत विचार केला जाईल.  – राहुल जाधव, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen − thirteen =