पिंपरी –  राज्यातील महानगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदामध्ये काम करणा-या कामगारांना अनेक समस्‍या भेडसावत आहेत. कायम कामगारांची संख्या कमी करून कंत्राटी कामगारांची संख्या वाढविण्यावर आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी प्रशासन, राज्‍यकर्त्यांकडून कामगार कायदा पायदळी तुडवला जात आहे. नियमांकडे बोट दाखवून कामगारांचे शोषण केले जात आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न, मागण्या सोडविण्यासाठी राज्‍यातील सर्व कामगार संघटनांना एकत्रित करून राज्‍यस्तरीय कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन करण्यात आली असून याव्दारे कामगार हितासाठी राज्यव्यापी लढा उभारण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे बबन झिंजुर्डे यांनी शनिवारी पिंपरी, पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.
  यावेळी झिंजुर्डे यांनी ‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीतील’ सदस्यांच्या नावाची घोषणा केली. कृती समितीचे निमंत्रक बबन झिंजुर्डे, रवी राव, शशांक राव, सुरेश ठाकूर, सदस्यपदी सुखदेव काशिद, रमाकांत बने, मोहन तिवारी, अनिल जाधव, बापू पवार, प्रकाश जाधव, दीपक कुलकर्णी, चारुशिला जोशी, दिलीप शिंदे, सुनील कंद, अशोक जानराव, गौतम खरात, गणेश शिंदे, प्रल्हाद कोतवाल, बाळा कदम, सुरेश चंडालिया यांची करण्यात आली.
  झिंजुर्डे म्‍हणाले की, ‘महाराष्ट्र राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समिती’च्या माध्यमातून विभागवार सहा मेळावे घेण्यात येणार आहेत. त्‍यामध्ये कामगारांच्या प्रश्नावंर चर्चा करून त्‍यांची एकजूट करण्यात येईल. महानगरपालिका, नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन दिले जात असल्‍याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र, त्‍यांना किमान वेतन मिळत नाही. ठेकेदार काही रक्‍कम पगारातून कापून घेतो. ही गरिबांची थट्‍टा आहे. सर्व महापालिका, नगरपालिका कामगारांच्या जीवाशी खेळत आहे. त्‍यांचे शोषण करीत आहेत, असे झिंजुर्डे म्‍हणाले.
   कायम कामगार आणि कंत्राटी, हंगामी, ठेकेदार कामगार असा भेदभाव न करता सर्वांनी एकत्र उभे राहून सरकार विरोधात लढा उभारला पाहिजे. तरच कामगार चळवळ जीवंत राहील, असे रवी राव म्‍हणाले. कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधी, सानुग्रह अनुदान, अन्य सुविधा मिळत नाहीत. किमान बोनस देखील दिला जात नाही. याविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. कृती समितीच्या माध्यमातून विभागवार बैठका घेऊन कामगार लढ्याची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे रवी राव यांनी सांगितले.
  कामगारांच्या अनेक समस्या, प्रश्न आहेत. आजच्या बैठकीत सर्व कामगार संघटनांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन सरकार विरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कामगार एकजुटीने कामगार चळवळीस नवी दिशा मिळणार आहे, असे शशांक राव म्‍हणाले. राज्‍यात नव्याने स्थापन झालेल्‍या महापालिका, नगरपरिषदांमधील कर्मचा-यांना अद्यापही ग्रामपंचायतीप्रमाणे पगार दिला जातो, त्यांना पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळत नसल्‍याचे समोर आले आहे. त्यासाठी आंदोलन करण्यात येईल, असेही शशांक राव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − 2 =