मराठी भाषा समिती सदस्य डॉ. स्नेहल तावरे यांचे मत

 

चौफेर न्यूज – आज मराठी सातासमुद्रा पलिकडेही आपले स्थान निर्माण करत आहे. महाविद्यालयात मराठी हा विषय घेतला की नकारात्मक दृष्टिने पाहिले जाते. परंतु, स्नेहवर्धन प्रकाशन आणि स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्युटचे संचालक पद सांभाळताना मराठीतील अनेक व्यवसायाच्या संधी शोधता आल्या. आपण परकीयांचे अनुकरण करतो, त्या अनुकरणातून आपण बाहेर पडले पाहिजे. श्रमाची प्रतिष्ठा जपणे आणि मूल्यधिष्ठित आचरण ही सूत्रे विद्यार्थ्यांना यशाकडे घेवून जातील, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा समिती सदस्य डॉ. स्नेहल तावरे यांनी केले. प्रा. रामकष्ण मोरे महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत शारदोत्सव या कार्यक्रमात मराठीतील नोकरी आणि व्यवसायाच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. तावरे म्हणाल्या, सूत्रसंचालक, प्रुफरिडर, माध्यमांसाठी लेखन, मराठी टायपिंग, मुलाखतकार, लेखक अशा कितीतरी संधी आहेत. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेवून आपला पाया भक्कम करणे आवश्यक आहे. स्वप्न सगळेच पाहतात, ती स्वप्ने लिहायला शिका, यातूनच तुमची कल्पनाशक्ती विकसित होईल. कल्पनेचे सम्राट व्हा, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तुमच्या कतृत्वाने चमकाल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे यांनी केले. त्यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत घेण्यात येत असलेल्या शारदोत्सव या कार्यक्रमाची माहिती दिली.

हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रकट वाचन तसेच डॉ. रजनी शेठ यांचे कथाकथन, दहाव्या समरसता साहित्य संमेलनातील विद्यार्थ्यांचा सहभाग या विषयी माहिती दिली. प्रसंगी, विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने पुस्तक प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख प्रा. अपर्णा पांडे यांनी केले. डॉ. धनंजय वाघमारे, डॉ. संगीता लांडगे, प्रा. भिसे, प्रा. गांवकर यांनी सहकार्य केले. स्मिता नितनवरे या विद्यार्थीनीने पाहुण्यांची ओळख करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − five =