प्रचिती इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

चौफेर न्यूज – साक्री प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील होते. प्रसंगी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव, शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते. इ.४ थी तील विद्यार्थी शिवाजी महाराजांच्या वेशभुषेत व काही विद्यार्थीनींनी राजमाता जिजाऊंच्या वेशभुषा परिधान करून कार्यक्रमात रंगत आणली. इ.१ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटना, प्रसंग या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. नितीन बानगुडे यांनी शिवाजी महाराजाचे बालपण व त्यांनी केलेले पराक्रम याबाद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान राजाला घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ, म्हणजे आई कशी असावी ? यांचे आदर्श व्याख्यान आजच्या आधुनिक माता, बंधु, भगिनींसमोर परखडपणे व्यक्त केले. शिवाजी महाराजांचा जिवन परिचय आपल्या शब्दांतुन व्यक्त करताना प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिस्तबद्ध लष्कर व संघटीत प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक समर्थशाली व प्रागतिक राज्य उभे केले. भुगोल व आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शुत्रुंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापुरच्या आदीलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. उत्कृष्ट योद्धा, आदर्शशासन कर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून त्यांचे नाव मराठा इतिहासात उच्चतम स्थानावर आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, शाळेचे शिक्षक शिवाजी साबळे यांनी शिवाजी महाराजांनी कोणकोणत्या युद्धकला अवगत केल्या व आपल्या राज्याचा विस्तार कसा वाढविला याविषयी विद्याथ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व संयोजन वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी सुंदर आकर्षक रांगोळीचे रेखाटन सीमा मोरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + nine =