चौफेर न्यूज –  प्रत्येक व्यक्तींला संसारी जीवनात व्यावसायीक अमिषांना बळी न पडता निस्पृहपणे, निगर्वी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक माता, पित्यांनी आपल्या पाल्यांवर उत्तम संस्कार करणे आवश्यक आहे. माता, पिता, गुरुजनांनी केलेले संस्कार व सतांचे आशिर्वादच मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतील. त्यासाठी प्रथम माता, पित्यांनी संतांच्या सान्निध्यात यायला हवे. जीवनात संगतीला खूप महत्व आहे. संतांबरोबर राहिल्यास जीवनात सदगुणांची वाढ होते. दुर्जनांच्या संपर्काने देखील आपल्या विचारांत, आचारात बदल होऊ शकतो. कमळ चिखलात उगवून देखील आपल्या सौंदर्याने, सुगंधाने परिसरात प्रसन्नता निर्माण करते. त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तींने मोहमयी संसारात निस्पृहपणे निर्णय घ्यावा, असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा 6 तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त सकाळी अंतगड सुत्रवाचन, प्रवचन, नवग्रह अनुष्ठान जप, मांगलिक, कल्पसुत्र वाचन, देवसी प्रतिक्रमण आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तसेच यावेळी मातृ – पितृ पूजन करण्यात आले.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, चातुर्मासात सर्वसृष्टीमध्ये उत्साहाचे वातावरण असते. याच काळात सर्वांनी ध्यान धारणा, धर्मकार्य व संतसंगतीने धर्मदान करून जीवनाचा अर्थ समजून घ्यावा. त्यासाठी आपण माता, पित्यांसह संत प्रवचनाचा लाभ घ्यावा. यातून मिळणा-या सकारात्मक ऊर्जेनेच व्यवसायीक जीवनातील संकटांचा सामना करण्याचे धैर्य मिळते. जसे प्रदुषित नाल्याचे पाणी जरी पवित्र नदीत मिसळले आणि ती नदी पुढे गंगेत एकरूप झाल्यानंतर त्याच प्रदूषित पाण्याला निसर्गाने केलेल्या प्रक्रियेने गंगाजलाचे महत्व प्राप्त होते; तसेच संसारातील स्वार्थी दुर्गूण व्यक्तिंचे देखील संत संगतीने सज्जन गृहस्थात परिवर्नन होते, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 + 4 =