चौफेर न्यूज : ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावास भेट दिल्यानंतर मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी मिश्कील खंत व्यक्त केली. त्यांनी व्यग्र कार्यक्रमातूनही येथे आवर्जून भेट देत आठवणींना उजाळा दिला. गावानेही त्यांचे गुढ्या उभारून व दारासमोर रांगोळी, फुलांचा सडा घालून आपुलकीने स्वागत केले.

या ८०० लोकवस्तीच्या गावामध्ये त्यांच्या भेटीने चैतन्य संचारले. सारा गाव त्यांच्या स्वागतासाठी एकवटला. गोलिवडेतील भोसले कुटुंबामध्ये पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब काही वर्षांनी कोल्हापूरला वास्तव्यास गेले.

माझी एक तक्रार आहे, पण आता तिचा काही उपयोग नाही; पण मामाच्या गावची पोरगी करायची पद्धत आपल्याकडे आहे. पण तुम्हीही तेव्हा कुणी काही विचारले नाही आणि ते माझ्याही लक्षात आले नाही. आता लग्न होऊन ५० वर्षे झाली. आता बोलून काही उपयोग नाही…, पवारांच्या या विधानावर जोरदार हशा पिकला. कोल्हापूरची माती, पाणी आणि माणसांचा माझ्या आईवर संस्कार होता. आम्हा भावंडांना तिने तेच संस्कार दिले. शाहू महाराज, फुले दाम्पत्य, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा आईवर होता. हीच विचारधारा महाराष्ट्राला शक्ती देईल, यावर तिचा विश्वास होता. आम्ही याच भूमिकेतून काम करीत आहोत. म्हणूनच महिला आरक्षणाचा देशात पहिल्यांदा निर्णय आम्ही घेतला, असे त्यांनी सांगितले. सरपंच नंदा चेचर यांच्या हस्ते पवार यांचा ग्रामदैवत भैरवनाथांची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + twenty =