चौफेर न्यूज – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी फरार आर्थिक घोटाळेबाज विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या तिघांवर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असून या आरोपींची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी ईडीने सुरु केली आहे. त्यानुसार, लंडनला पळून गेलेला मद्य व्यापारी विजय माल्ल्यावर पहिली कारवाई होणार आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतिन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे.

याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ईडीला बँकांचे कर्ज बुडवणारे तसेच विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटले सुरु असणाऱ्या न्यायालयांशी संपर्क साधत या सर्वांविरोधात नव्या अध्यादेशानुसार कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, फरार आरोपींच्या देशातील तसेच परदेशातील संपत्तीवर तत्काळ जप्ती आणण्यात येणार आहे. ईडीच्यावतीने आजवर प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत जप्तीची कारवाई केली जाऊ शकत नव्हती. पण या कायद्यानुसार, ईडीला संपूर्ण सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच संपत्ती जप्तीची कारवाई करता येत होती. त्यामुळे या प्रक्रियेला मोठा काळ लागत होता.

सीबीआय आणि ईडीच्यावतीने आर्थिक घोटाळ्यांतील या आरोपींविरोधात आपापले आरोपपत्र दाखल केल्यानंतर नव्या अध्यादेशानुसार नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे प्रकरण चालवले जाणार आहे. माल्ल्या प्रकरणात ईडीने आजवर ९,८९० कोटी आणि नीरव मोदी-चोक्सी यांच्या प्रकरणात ७,६६४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या अध्यादेशानुसार, पहिली कारवाई १५,००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते. त्यानंतर इतरही प्रकरणांमध्येही यापुढे अशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 + 15 =