पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी मावळ मतदारसंघात प्रचाराच्या सभा घेतल्या. त्यानंतर, आज (शनिवार दि.२७) रोजी सायंकाळी ६ वाजता थंडावल्या आहेत. आरोप-प्रत्यारोप यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रचार सभांनी या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती. सोमवारी दि.२९ रोजी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार असून सर्व उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यात थेट लढत होत आहे. पार्थ पवार हे पवार घराण्यातील उमेदवार असल्यामुळे सर्वच राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले असून पवारांची प्रतिष्ठान पणाला लागली आहे. पक्षाचे राज्यातील अनेक नेते पदाधिकारी तसेच घरातील सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात तळ ठोकला होता. पार्थ यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे वडील अजित पवार यांनी सांभाळली होती.

शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेतलेली पहायला मिळाली. दरम्यानच्या काळात पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आणि बारणे यांच्यातील मनोमिलनामुळे त्यांचे पारडे अधिकच जड झाले होते. आज शेवटच्या दिवसापर्यंत स्वतः लक्ष्मण जगताप प्रचारात सक्रिय राहिले ही श्रीरंग बारणे यांची जमेची बाजू ठरली. बारणे यांच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, अनंत गीते, आरपीआयचे नेते रामदास आठवले, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, आदेश बांदेकर यांनी सभा घेतल्या. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांचा प्रचार मर्यादित झालेला पहावयास मिळाला. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची केवळ एकच सभा मावळमध्ये झाली.

दरम्यान शेवटच्या दोन दिवसात आरोप-प्रत्यारोपमुळे मावळच्या लढतील चांगलीच रंगत आली होती. पार्थ पवार यांचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे निवडणूक वेगळ्याच दिशेने चाललीयं की काय? असा प्रश्न देखील उपस्थित झाला होता. आज सायंकाळी सहापासून प्रचार बंद झाला असून पूर्ण मतदारसंघावर पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग यांचा बारीक वॉच राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen − 10 =