चौफेर न्यूज –  सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच सहयोगी बँका आणि भारतीय महिला बँकेचे जुने चेक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंतच वैध असतील. १ जानेवारी २०१८ पासून या बँकांचे चेक अवैध ठरवण्यात येणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या सहयोगी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर या बँकांचा समावेश आहे.

यंदाच्या एप्रिल महिन्यातच या बँका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन करण्यात येणार आहेत. याशिवाय भारतीय महिला बँकेचेही एसबीआयमध्ये विलिनीकरण झाले होते. १ एप्रिल २०१७ रोजी विलिनीकरणानंतर एसबीआयचे जुने चेकबुक ३० सप्टेंबरपर्यंतच वैध असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाने ही मर्यादा वाढवून ३१ डिसेंबर २०१७ केली होती. एसबीआयने याआधी सुमारे १३०० बँक शाखांचे आयएफएससीही बदलले आहेत. एसबीआयचे नवे चेकबुक मिळवण्यासाठी खातेदारांना बँकेच्या शाखेत किंवा एटीएममध्ये जाऊन किंवा मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज करावा लागेल.

एसबीआयच्या संकेतस्थळाचा पत्ताही बदलण्यात आला आहे. बँकांच्या विलिनीकरणानंतर आता एसबीआय खातेदारांना संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल. जर तुम्ही विलीन केलेल्या जुन्या पाच बँकांचे खातेदार असाल तर घाबरू नका. तुम्ही जुन्याच लॉगइन आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकता. या नव्या संकेतस्थळावर तुम्ही जुन्या युझर आयडीद्वारे बँकिंगचे व्यवहार करू शकता. जर तुमचा आयडी किंवा पासवर्ड कार्यरत नसेल तर तुम्ही याची तक्रार एसबीआयकडे करू शकता.

एसबीआयच्या अधिकृत परिपत्रकानुसार, विलीन केलेल्या सहयोगी बँकांच्या नेट बँकिंगचे फीचर्स आणि एसबीआयचे फीचर्स मिळतेजुळते आहेत. त्यामुळे तिथे सर्व सुविधा पहिल्यासारख्या उपलब्ध असतील. विलिनीकरणानंतर तुम्हाला पुन्हा एकदा मोबाईल नंबर रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. थर्ड पार्टी बेनिफिशरीची यादीही पहिल्यासारखीच कायम असेल. मात्र ग्राहकांना एसबीआयच्या नव्या संकेतस्थळावर आपापला ई-मेल आयडी रजिस्टर करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + one =