चौफेर न्यूज – एकीकडे भारतीय संघात नवोदीत खेळाडू आपली जागा पक्की करण्यासाठी धडपडत असताना; सुरेश रैना, युवराज सिंह यांसारख्या खेळाडूंची कारकिर्दीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सुरेश रैनाने मोठ्या कालावधीनंतर आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. मात्र डावखुरा अष्टपैलू खेळाडु युवराज सिंह अजुनही भारतीय संघाच्या बाहेर आहे. वाढतं वय आणि बिघडत चाललेला फॉर्म पाहता अनेकांनी युवराज आणि रैनाला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. मात्र ३६ वर्षीय युवराज सिंहने भारतीय संघात पुनरागमन करण्याची आशा अजुन सोडलेली नाहीये.

SportsLive या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत युवराज सिंहने आपल्या निवृत्तीविषयीचं मत मांडलं. “कोणतीही गोष्ट मनात ठेवून मला निवृत्ती स्विकारायची नाहीये. एखादी गोष्ट करायची राहून गेली असा विचार निवृत्तीनंतर माझ्या मनात येऊ द्यायचा नाहीये. ज्यावेळा मी माझी सर्वोत्तम खेळी करेन आणि यापुढे आपण क्रिकेट खेळू शकणार नाही असं मला वाटेल, त्यावेळी मी स्वतःहून निवृत्त होईन. आयपीएल खेळायला मिळावं म्हणून मी क्रिकेट खेळत नाहीये. मी अजुनही भारतीय संघात पुनरागमन करु शकतो. साधारण २-३ आयपीएल स्पर्धा खेळू शकेन इतकी स्फुर्ती अजुनही माझ्या अंगात कायम आहे.” युवराज सिंह मुलाखतीमध्ये बोलत होता.

माझा आतापर्यंतचा प्रवास नक्कीच चांगला झाला. कारकिर्दीत आतापर्यंत अनेक संकटांचा सामना केला. कॅन्सरवर मात करुन संघात पुनरागमन केल्यानंतर माझं आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरावं असं मला नेहमी वाटत राहिलेलं आहे. यापुढच्या काळात जेव्हा कधीही मला खेळण्याची संधी मिळेल त्यावेळी मी १०० टक्के प्रयत्न करुन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. २०१७ साली चॅम्पियन्स करंडकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळलेला एकदिवसीय सामना हा युवराजचा शेवटचा सामना ठरला आहे. यानंतर युवराजला संघात जागा मिळू शकलेली नाही. २०१८ च्या आयपीएल हंगामात युवराज किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळणार आहे. २ कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाबच्या संघ व्यवस्थापनाने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतलंय. त्यामुळे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन युवराज भारतीय संघात पुनरागमन करतो का हे पहावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 7 =