चौफेर न्यूज – पीएनबी बँक घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी आपले मौन तोडले असून आपण गव्हर्नर असताना सर्व बँकांना स्विफ्ट नेटवर्कसंदर्भात तपास करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर बँक घोटाळ्यांची एक यादीही पंतप्रधान कार्यालयाला पाठवली होती. तसेच बँकिंग इन्व्हेस्टिगेटर आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडून यांची संयुक्त चौकशीची करण्याची विनंतीही केली असल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्याही काळात रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. नेमके या दोघांपैकी कोण पंतप्रधान असताना बँक घोटाळ्यांची यादी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली, यासंदर्भात राजन यांनी काहीही सांगितले नाही.

राजन म्हणाले, बांगलादेशातील एका बँकेत स्विफ्ट यंत्रणेत दोष असल्याचे आढळून आले. जेव्हा अशा प्रकारची समस्या दिसून येते, तेव्हा त्याची माहिती बँकांना देण्याची जबाबदारी नियामकांची असते. आम्हीही असेच केले आणि बँकांना हे दोष दूर करण्यास सांगितले. बँकांनी हे आदेश पाळले नसतील, तर त्यांनी तसे का केले, हे समजून घेणे आवश्य आहे. असेही राजन यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

स्विफ्ट ही एक अशी यंत्रणा आहे, जी जगभरातील बँका व वित्तीय संस्थांमध्ये संपर्क स्थापित करते. तसेच हिच्या सहाय्याने जगातील वित्तीय संस्थांमध्ये ट्रांझेक्शनसंदर्भातील माहितीचे सुरक्षित, विश्वासार्हपणे आदान प्रदान होते. पीएनबी घोटाळ्यातील हमीपत्रे का दिली गेली? त्यांची नोंदणी बँक व्यवस्थेत का केली गेली नाही? बँक व्यवस्थापनास याची माहिती होती का? ही माहिती बोर्डासमोर ठेवली होती का ? असे अनेक प्रश्न रघुराम राजन यांनी यावेळी उपस्थित केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − eleven =