चौफेर न्यूज – शेतकऱ्यांनी 1 जून 2017 रोजी संप पुकारला होता, त्याला 1 वर्ष झाल्याच्या निमित्तानं राज्याच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा शेतकरी संपाची हाक देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. संपानंतर सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीनं 1 ते 10 जून दरम्यान यंदा पुन्हा संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील संदीप गिड्डे, बुधाजीराव मुळीक, गिरीधर पाटील या नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय किसान महासंघानं परिपत्रकाद्वारे हे स्पष्ट केलं आहे.

एकीकडे राष्ट्रीय किसान महासंघानं संप पुकारला आहे तर दुसरीकडे सुकाणू समिती दुधाच्या प्रश्नासाठी राज्यात आंदोलन करणार आहे. यामध्ये किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, लाखगंगा आंदोलक यांसह 18 वेगवेगळ्या शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

सर्व दूध उत्पादक जिल्ह्यातल्या तहसील कार्यालयांमध्ये जनावरं बांधून आणि सरकारच्या दगडी पुतळ्याला दुधाचा अभिषेक घालून हे आंदोलन करण्यात येणार आहे, असं लाखगंगा इथं झालेल्या ग्रामसभेत आमदार बच्चू कडू, डॉ. अजित नवले आणि धनंजय धोरडे यांनी स्पष्ट केलं होतं.

 तहसीलदारांना भाकड गाय भेट

औरंगाबाद जिल्ह्याच्या लाखगंगा येथील शेतकऱ्यांनी आज वैजापूरमध्ये आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी वैजापूरच्या तहसीलदार सुमन मोरे यांना फुकट भाकड गाय देत दूध दरवाढीसाठी निवेदन दिलं. तर संगमनेरच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून अशा पद्धतीनं आंदोलनात भाग घेतला.

या आहेत संपकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त आणि वीजबिल मुक्ती

शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव

दुधाला किमान 50 रुपये हमीभाव

वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कसत असलेल्या सर्व प्रकारच्या जमिनी कसणारांच्या नावे करा

कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना पेन्शन द्या

शेतकऱ्यांसाठी पीक, पशु आणि कुटुंब आरोग्य विम्याचे सर्वंकष संरक्षण

बाजार समित्या सुरळीत?

राज्याच्या बाजार समित्यांमधले व्यवहार मात्र सुरळीत सुरू आहेत. नाशिकमध्ये सुद्धा व्यवहार सुरळीत आहेत. पण आवक मात्र मंदावली आहे.

“आम्ही व्यवहार सुरळीत सुरू ठेवले होते, सकाळी आवक होती पण ती दुपारनंतर रोडावली, साधारणपणे 30 % टक्केच माल आज बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणला आहे, एकूण आवक 70 टक्क्यांनी मंदावली आहे. आम्ही यापुढे ही बाजार समितीत व्यवहार सुरळीत ठेवू,” असं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांनी बोलताना सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 5 =