शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधुनी एकत्र यावे अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र, त्यासाठी दोघांची इच्छा असणे महत्वाचे आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी शनिवारी केले.

येथील डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित दुस-या युवा संसदेच्या उद्घाटनापूर्वी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येतील की नाही, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. याविषयी विचारले असता जोशी म्हणाले, दोघांनी एकत्र यावे अशी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, यासाठी त्या दोघांची इच्छा असणे महत्वाचे आहे. त्यासाठी मी मध्यस्थी करणार नाही. दोघे एकत्र आले तर यश अधिक जवळ येईल. राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल.

दोन्ही पक्षांचे ध्येयवाद एक असताना वेगळे झाल्यावर नुकसान होते. मात्र, युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. या निर्णयामुळे शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचा नक्कीच फायदा होईल. मी ज्योतिषी नसलो तरी ज्योतिषी म्हणून सांगतो, मुंबई महापालिका निवडणुकीत एकटी शिवसेना सर्वाधिक जागा मिळवेल, असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेचा कारभार समर्थपणे चालवत आहेत. युतीत पंचवीस वर्ष सडली या त्यांच्या मताशी सहमत असल्याचेही जोशी यांनी नमूद केले.

शिक्षण विभागाशी संबंधित अनेक निर्णय मागे घेण्यात आले. यावर कुणाचेही नाव न घेता जोशी म्हणाले, शिकलेला, हुशार माणूस मंत्री व्हायला हवा. निर्णय घेण्याची कुवत नसणारी माणसे मंत्री होत असल्याने निर्णय चुकत आहेत. मंत्रीपद देण्याची जबाबदारी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि संबंधित पक्षाची असते. सोयीनुसार मंत्री नेमण्यापेक्षा देश पुढे नेतील अशा लोकांनाच मंत्रीपद द्यावे, अशी टीकाही जोशी यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × one =