चौफेर न्यूज –  राफेल खरेदीच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ प्रतिमेला डागाळण्याचा प्रयत्न केला. तसेच देशवासीयांच्या विश्वासालाही तडा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालं आहे. त्यामुळे तोंडघशी पडलेल्या राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशवासीयांची माफी मागावी, अशी आग्रही मागणी खासदार अमर साबळे यांनी केली आहे.

देशाच्या संरक्षण खात्याला अधिक बळकटी प्राप्त व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल जातीची मध्यम वजनाची बहुउद्देशीय लढाऊ विमानांचा करार केला. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या कराराविरोधात आरोपांचे रान उठवले होती. तसेच न्यायालयात चार याचिका दाखल केली होती.

या सर्व याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्या. राफेल विमानांच्या क्षमतेबाबत न्यायालयाला कोणताही संशय नाही. तसेच या खरेदी व्यवहार प्रक्रियेत कोणती त्रुटी आहे, असे आम्हाला वाटत नाही. असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संसदेच्या राज्यसभा सदनात खासदार अमर साबळे आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी ‘राहुल गांधी माफी मांगो’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी खासदार साबळे यांनी पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळात गेल्या साडेचार वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक कारभार केला आहे. त्यामुळे गैरव्यवहाराचा आरोप करण्याची एकही संधी काँग्रेस पक्षाला मिळाली नाही. यामुळे चलबिचल झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी राफेल खरेदीवरून पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींसह सर्व काँग्रेसी जोरदार तोंडघशी आपटले आहेत.

दरम्यानच्या काळात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे देशवासीयांमध्येही संभ्रमाचे वातावरण होते. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर हा संभ्रम दूर झाला आहे. मात्र संरक्षणासारख्या गंभीर आणि महत्वपूर्ण विषयावर देशवासीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सर्व देशवासीयांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर माफी मागावी, अशी आग्रही मागणी खासदार साबळे यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − six =