चौफेर न्यूज – रायगड किल्ल्यावर बुधवारी ३४५वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील १० हजारांहून अधिक शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती, दुर्गराज रायगड यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि कोल्हापुरचे युवराज शहाजी राजे भोसले उपस्थित होते.

दोन दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरवात मंगळवारी दुपारी गडपुजनाने झाली. यावेळी २१ गावातील नागरीकांनी एकत्र येऊन गडपुजन केले. यानंतर किल्ल्यावर उत्खननात सापडलेल्या वस्तूच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर शिरकाई देवी मंदिरात गोँधळ तर जगदिश्वर मंदिरात किर्तन सोहळा संपन्न झाला. राज्यभरातील विविध भागातून आलेल्या शिवभक्तांनी होळीच्या माळावर मर्दानी खेळ सादर करीत महाराजांना मानवंदना दिली. रात्री उशीरा राजसदरेसमोर ही रात्र शाहिरांची हा शाहीरीचा कार्यक्रम संपन्न झाला.

बुधवारी सकाळी सहा वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. पहाटे नगारखाना परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राजसदरेवर शाहिरांनी महाराजांना मानवंदना दिली. सकाळी साडे नऊच्या सुमारास छत्रपती संभाजी राजे यांचे राजसदरेवर आगमन झाले. यानंतर मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या सिहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पालखीतील मुर्तीला पंचामृत, सप्तगंगा स्नान घालून विधीवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय सोहळ्याला हजारो शिवभक्त, महिला आणि पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शंखनाद आणि तुतारीबरोबरच शिवप्रभूंच्या जयजयकाराने अवघा रायगडचा परिसर दुमदुमून गेला होता. राज्यभरातून आलेल्या शिवप्रेमींनी यावेळी मैदानी खेळांची, शस्त्र कवायतीचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समोरोप झाला.

सोहळ्यानिमित्ताने गडावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवप्रेमींच्या उत्साहामुळे अवघा आसमंत शिवगर्जनांनी दुमदूमून गेला होता. सोहळ्यानिमित्ताने रायगडावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक नियमनही करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 3 =