चौफेर न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार करण्याच्या दृष्टीने ही बैठक आहे. काँग्रेससोबत होणा-या आघाडीत समसमान जागांवर लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे, त्यावरही या बैठकीत चर्चा होत आहे. आज १० उमेदवारांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. यानंतर संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले की, पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे, किंवा इच्छूकांची यादी तयार केली जाण्याच्या दृष्टीने ही बैठक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणूक काँग्रेससोबत लढविणार आहे. आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्म्यूला कसा राहील यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३८ जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी लवकरच उमेदवार घोषित करण्याची शक्यता आहे. मागील वेळी काँग्रेसला जास्त जागा देऊनही त्यांना दोन जागांवर विजय मिळाला होता तर राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यंदा समसमान जागा (५०/५०) वाटपावर राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहाणार असल्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांमध्ये काही जागांवरुन वाद आहेत. नुकतेच अहमदनगरच्या जागेवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दावा केला होता, तर त्याच्या दुस-याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जागा राष्ट्रवादीकडेच राहाणार असल्याचे ठणकावून सांगितले होते.

 

२०१४ मध्ये जागा वाटपाचा फॉर्म्यूला

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये २१ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी चार जागांवर त्यांना विजय मिळाला होता. काँग्रेसला राष्ट्रवादीपेक्षा सहा अर्थात २७ जागा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांना फक्त दोन ठिकाणीच विजय प्राप्त करता आला होता. त्यामुळे शुक्रवारी होणा-या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अधिकच्या जागांसाठी आग्रही राहाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस २४ जागा लढविण्याच्या तयारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two − two =