या निर्णयाचा नेत्यांनी फेरविचार करण्याची नगरसेवक रवि लांडगे यांची सुचना

चौफेर न्यूज पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरीत उभारलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि भविष्यासाठी घातक आहे. खासगीकरणानंतरही ते चालवण्यासाठी वर्षाला २० कोटी रुपये मोजणे म्हणजे महापालिकेचा उफराटा कारभार आहे. करदात्या नागरिकांनी घाम गाळून भेरलेला कररूपी पैसा सुद्धा पळवण्याचा हा प्रकार घृणास्पद आहे. गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी उभारलेल्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याला माझा तीव्र विरोध आहे, असे भाजपचे नगरसेवक रवि लांडगे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मत मांडेल आहे.

भोसरी रुग्णालय खासगीकरणाला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोध करायचा होता. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका सभागृहात घातलेल्या गोंधळामुळे आपणाला ही संधी मिळाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालय खासगीकरणाच्या निर्णयामुळे सत्ताधारी भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रवि लांडगे म्हणाले की, महापालिकेने भोसरी रुग्णालय खासगी संस्थेस चालवण्यास देण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाला शहराच्या सर्वच स्तरातून विरोध होत आहे. तसेच, या निर्णयामुळे भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोपही पक्षावर आणि पदाधिकाऱ्यांवर होऊ लागले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्या या निर्णयाला माझा तीव्र विरोध आहे. या निर्णयाचा फेरविचार करून नागरिकांमध्ये पक्षाप्रती विश्वास निर्माण करण्याची आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी करणार आहे. भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेत असताना स्थानिक नगरसेवकांना अजिबात विश्वासात घेतले गेलेले नाही. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय सर्वसाधारण सभेपुढे आल्यानंतरच नगरसेवकांना त्याबाबत माहिती मिळाली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाला माझा विरोध करण्याचा निर्धार होता. परंतु, ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने गोंधळ घातला. या विषयावर चर्चाच झाली नाही, आणि मलाही माझी बाजू मांडणे शक्य झाले नाही.

या विषयावरून सत्ताधारी म्हणून भारतीय जनता पक्षावर चिखलफेक होत आहे. त्याचा पक्ष पदाधिकाऱ्यांनी कोठे तरी विचार करावा आणि भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येऊ नये. खासगणीकरणाला आपला तीव्र विरोध राहिल. भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष दिवंगत पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचे म्हणणे होते की, समाजातील प्रत्येक गरीब माणसाला पक्षाचा व पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या सत्तेची मदत व उपयोग झाला पाहिजे. परंतु, त्यांच्या या म्हणण्याच्या विरोधात सध्या महापालिकेत कृती सुरू आहे, असेही लांडगे म्हणाले आहेत.

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणामुळे गरीब रुग्णांची विवंचना होणार आहे. त्यातून पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात कृती घडणार आहे. ती पक्षाला हानी पोचवणारी आहे. त्याहूनही अधिक गोरगरीब रुग्णांना हानी पोचवणारी आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करावा. भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या मंजूर प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये. हे रुग्णालय महापालिकेनेच चालवावे, अशी मागणी लांडगे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + fourteen =