नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी आज, मंगळवारी संपणार आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावतीसह १३ राज्यांतील ९७ जांगावर १८ एप्रिलला मतदान होत आहे. यात मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून उमेदवारांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅलींवर भर राहणार आहे.

अखेरच्या दिवशी विदर्भात एकच मोठी सभा अमरावती येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची होणार आहे. बुलडाणा मतदारसंघातील चिखली येथे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी सभा घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुकुल वासनिक यांनी बुलडाण्यात महाआघाडीचे राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी सभा झाली. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांच्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आधी सभा घेतली आहे. नेत्यांनी शहरी भागावर लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला मतदारसंघात प्रचाराचा जोर कमी आहे. महायुतीचे संजय धोत्रे यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभा झाल्या. काँग्रेसचे हिदायत पटेल यांच्यासाठी नेत्यांनी सभांऐवजी बैठकांवरच जोर दिला. वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सभांऐवजी प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. अमरावती मतदारसंघात महायुतीचे आनंदराव अडसूळ विरुद्ध महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांच्यात लढत आहे. राणा यांनी शरद पवार यांच्यासोबत अभिनेता गोविंदा, सुनील शेट्टी यांच्या सभा घेतल्या. काँग्रेसचा मोठा नेता राणा यांच्या प्रचारासाठी आलेला नाही. अडसूळ यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमख उद्धव ठाकरे यांच्यासोबत गृहमंत्री राजनाथसिंह आले होते. ‘वंचित’चे गुणवंत देवपारे यांच्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि खा. असदुद्दीन ओवैसी यांची अमरावतीत सभा झाली.

 महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात..

दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील दहा जागांसोबतच तामिळनाडूमधील ३९, कर्नाटकातील १४, उत्तर प्रदेशातील आठ, बिहार, आसाम, ओडिशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन तर पुदुच्चेरी, मणिपूर, त्रिपुरा येथील प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे. दक्षिणेतील प्रचारावर भाजप, काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 4 =