आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

पिंपरी चिंचवड ः लोकांची गरज ओळखून नगरसदस्यांनी प्रभागात विकासकामे करावीत. शरदनगर ते शिवाजीपार्क भुयारी मार्ग विकसित करुन महानगरपालिकेने नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. त्या भागातील नगरसदस्यांनी केलेला पाठपुरावा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र.11 मधील शरदनगर ते शिवाजीपार्क, संभाजीनगर चिंचवड यांना जोडणार्‍या भुयारी मार्गाचे लोकार्पण रविवार (दि.23) झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर राहूल जाधव होते. या वेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती अश्‍विनी बोबडे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे आदी उपस्थित होते.

भुयारी मार्गाला स्वामी विवेकानंदांचे नाव…
आमदार महेश लांडगे म्हणाले की, या भुयारी मार्गाला स्वामी विवेकानंदाचे नाव देण्यात आले आहे. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदाच्या विचारांची माहिती नागरिकांपर्यंत जावी, याकरिता एकूण 20 म्युरल्स बसविण्यात आले आहेत. नागरिकांनी दिलेल्या सूचना आयुक्त नेहमीच सकारात्मक भावनेतून अमंलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतात. या परिसरात नव्याने सांस्कृतिक भवन निर्माण करायला हवे, असेही ते म्हणाले.

एका वर्षात काम होणार पूर्ण…
सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, या भुयारी मार्गापूर्वी विदयार्थी व नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी कसरत करावी लागत होती.  ही गरज ओळखून आम्ही प्रथम या भुयारी मार्गाचे काम प्राधान्याने सुरु केले. एका वर्षात हे काम पूर्ण करुन नागरिकासांठी खुला केला आहे. प्रभाग क्रमांक 11 हा स्मार्ट प्रभाग म्हणून आगामी काळात विकसित करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

पीएमपीएलच्या 450 बसेस सेवेत लवकरच दाखल…
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, शहर विकसित होत असताना अनेक समस्याही निर्माण होत असतात. नागरिकांना क्रिडांगणे, उदयाने व शाळा यासह विविध सुविधांची गरज असते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यादृष्टीकोणातून नियोजन करीत आहे. या भुयारी मार्गाला स्वामी विवेकानंदांचे नाव देण्यात आले आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण करुन द्यावे. शहर स्वच्छतेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांसाठी पीएमपीएलच्या 450 बसेस सेवेत लवकरच दाखल होणार आहेत. त्या माध्यमातून नागरिकांसाठी सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. भविष्यातील वाहतूक लक्षात घेता एचसीएमटीआर या मार्गाचा विकास करावा लागेल असेही ते म्हणाले.

5 कोटी 49 लाख रुपये खर्च…
शरदनगर,कोयना नगर, संभाजीनगर, स्वामी समर्थ सोसायटी, शिवाजी पार्क येथील नागरिक, वृध्द व लहान मुलांना रस्त्याच्या बाजूस असलेल्या शैक्षणिक संस्था, दवाखाने, सांस्कृतिक सभागृह, प्रशासकीय कार्यालय, इ.ठिकाणे जाण्यासाठी स्पाईन रोड ओलांडून जावे लागत होते. त्यामुळे नागरिकांना व दुचाकीस्वारांना सुरक्षितरीत्या रस्ता ओलांडण्यास मदत होणार आहे. या भुयारी मार्गाच्या निर्मीती साठी सूमारे 5 कोटी 49 लाख रुपये खर्च आला आहे. या भुयारी मार्गाची एकूण लांबी 53 मीटर असून रुंदी 7.00 मीटर आहे व उंची 2.65 मीटर आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले तर महेंद्र ठाकूर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × five =