एसबी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन येथे शिक्षक दिनानिमित्त वास्तूविशारदांचा सन्मान

पिंपरी/पुणे : चांद्रयानासारखी मोहिम विकसित राष्ट्रांपेक्षा कमी खर्चात करणे विकसनशील भारत देशाला शक्य झाले. हे भारतात विकसित झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे यश आहे. वास्तुरचनेत देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा कमी खर्चात सर्वसामान्यांसाठी वापरल्या जाव्यात अशी अपेक्षा, ज्येष्ठ वास्तु विशारद प्रा. श्रीकांत भाटे यांनी व्यक्त केली.

पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील एसबी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनच्या वतीने सोमवारी (9 सप्टेंबर 2019) शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ वास्तू विशारदांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनावणे, गोरख भालेकर, रजिस्टार योगेश भावसार, गौरवमूर्ती वास्तूविशारद राधिका वैद्य, वसुधा गोखले, राजाराम गोलगिरे, अतुल भागवत, प्रसाद गणपुले आदी उपस्थित होते.

प्रा. भाटे पुढे म्हणाले, आपली संस्कृती, कला, सौंदर्य व आधुकनिक तंत्रज्ञान यांचा उत्कृष्ट वापर वास्तू विशारदांनी आपल्या कलाकृतीत केला पाहिजे. दक्षिण भारतात हजारो वर्षांपूर्वी उभारलेली शेकडो मंदिरे आजही दिमाखात उभी आहेत. हे वास्तू विशारदांमुळेच शक्य झाले आहे. एखादी कलात्मक वास्तू उभारताना सौंदर्यात्मक संकल्पना वास्तू विशारदाच्या कलाकृतीत दिसली पाहिजे. जगभर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वेगाने होत आहे. आर्किटेक्ट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्यास स्पर्धा वाढेल, त्यामुळे उत्कृष्ट व दर्जेदार वास्तूंची निर्मिती कमी खर्चात होऊ शकेल. त्यातून सर्वसामान्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा लाभ होईल. मोठ्या गृहप्रकल्पांचे समूह, मोठे हॉटेल्स, कॉर्पोरेट इमारती नवीन तंत्रज्ञानाने कमी वेळात कमी खर्चात उभारणे शक्य आहे. त्यासाठी शासकीय सार्वजनिक संस्था, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि आर्किटेक्टचे शिक्षण देणा-या महाविद्यालयांनी एकत्रित काम केले पाहिजे, अशी अपेक्षा प्रा. भाटे यांनी व्यक्त केली.

स्वागतपर प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे म्हणाले की, शिक्षकांचा गौरव करतानाच त्यांचे अमुल्य अनुभव आजच्या पिढीला मिळावेत. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक बदल व्हावेत या उद्देषाने हा गौरव समारंभ आयोजित केला आहे. गौरव मूर्तींच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा उपयोग विद्यार्थ्यांना निश्चितच होईल. या संस्थेची दर्जेदार शिक्षण देण्याची नेहमीच भूमिका असल्याचे प्राचार्य सोनवणे यांनी सांगितले.

भाईजान काझी म्हणाले की, पीसीईटी आणि एसबी पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईनमध्ये आधुनिक शिक्षण देत आंतरराष्ट्रीय दर्जाचे वास्तूविशारद घडविण्याचा वसा घेतला आहे. या सत्कारमूर्तींच्या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या भावी कार्यकाळात करावा.

या कार्यक्रमाचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. मदुरा मेरूरकर यांनी तर आभार गोरख भालेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × five =