विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षणातून मनोरंजनाचा आनंद

साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सांस्कृतिक महोत्सवांतर्गत दोन दिवसीय आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळावा, व्यावहारिक ज्ञानाची प्रत्यक्ष जीवनाशी सांगड घालता यावी, नाणी व नोटा यांची समाज, नफा व तोटा या बाबी समजणे या हेतूने मेळावा भरविण्यात आला. पारंपारिक मराठमोळी वेशभूषा घातलेले विद्यार्थी मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले. काही मनोरंजक खेळाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. दैनंदिन दिनचर्येतून उसंत मिळावी व अभ्यासाचे ताण कमी व्हावे हे या मेळाव्याचे उद्धिष्ट होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी व उद्घाटक तसेच प्रमुख अतिथींनी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉल वर जाऊन विद्यार्थ्यांकडून नास्ता व इतर वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहित केले.

तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन सरस्वती पूजनाने अध्यक्ष व उपाध्यक्ष मान्यवरांच्या हस्ते झाली. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साक्रीच्या नगरसेविका ॲड. पुनम काकुस्ते होत्या. तसेच, मनिषा गाभडा, ब्युटीशियन स्वाती भदाणे, तसेच बच्छाव सर त्याचबरोबर शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी उपस्थिती दर्शविली. प्रसंगी, जादुगार अरुण यांचा जादुचा मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला. त्यांनी विविध जादुचे खेळ सादर केले.

 साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल, साक्री येथील दि. ०६ रविवारी रोजी विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव मिळावेत, तसेच अध्ययन व अध्यापन प्रक्रीया सुलभ तसेच मनोरंजनात्मक व्हावी, यासाठी “बालआनंद मेळावा” साजरा करण्यात आला. आनंद मेळाव्यासाठी आकर्षक रांगोळी वृषाली सानवणे, हिरल सोनवणे यांनी रेखाटली. कार्यक्रमाची सुत्रसंचालन स्नेहल सोनवणे व स्मिता नेरकर, सिमा मोरे यांनी केले.

कार्यक्रमाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून झाले. तसेच प्रमुख मान्यवरांनी स्पर्धकांच्या कलागुणांना प्रेरणा दिली. या आनंद मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामध्ये पाणीपुरी, भेळ, मिसळ, दाबेली, आईस्क्रीम, दम बिर्यानी, चिकन टिक्का, चिकन बिर्यानी अशा प्रकारचे स्टॉल लावून पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तसेच, महिला बचत गट व ज्या स्त्रिया घरी बसून व्यवसाय करतात. त्यांना देखील रोजगाराची संधी या मेळाव्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली.

बाल आंनद मेळाव्यामध्ये नुतन असे घोड्याचे व बैलगाडीचे आकर्षण ठरले होते. यात चिमुकल्यांनी घोडा, बैलगाडीची देखील सवारी केली. तसेच, यामध्ये पाळणे देखील आयोजित करण्यात आले होते. त्यात पाळणे, झुले, मिकीमाऊस, जम्पींग, बोटींग इ. यात सर्व चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद लुटला.

प्रमुख पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केली. विद्यार्थ्यांनी स्वतः खरेदी व विक्री केली. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला. यातुन विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानात भर पडली. विद्यार्थ्यांचे शिक्षण ज्ञानरचनावाद पध्दतीने आनंददायी व कृतीयुक्त व्हावे, तसेच विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रत्यक्ष अनुभवातुन व्हावे, यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे स्कूलचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले. या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळुन विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य वृध्दींगत होते आणि अध्ययन व अध्यापन प्रक्रिया रंजक व सुलभ होते. तसेचश्रमप्रतिष्ठा मुल्य वृध्दींगत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

12 + ten =