चौफेर न्यूज – टपाल खात्यात कर्मचाऱ्यांची लवकरात-लवकर नोकर भरती करावी या मुख्य मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज, ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन आणि एम. टी. एस संघटनेने शुक्रवारपासून (दि. 20) राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक दिली आहे.

राज्यभरात गेल्या सात ते आठ वर्षात टपाल खात्यातील प्रादेशिक विभागात कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. यामुळे, प्रत्येक कार्यालयात हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कामगार शिल्लक आहेत. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे प्रचंड कामाचा ताण जाणवत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात चाळीस टक्के टपाल कर्मचारी आणि एम. टी. एस कर्मचाऱ्यांच्या जागा अपुऱ्या आहेत. यामुळे टपाल खाते नागरिकांना योग्य सुविधा पुरवू शकत नाही. थेट, अनुकंपा, जीडीएस, खेळाडू आदीमधून या जागा भरुन हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी संघटनांची मागणी आहे.

नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे पुणे शहर पुर्व विभागाचे सचिव डी. आर. देवकर म्हणाले, टपाल खात्यात शासनाने लवकरात-लवकर भरती केल्यास सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. टपाल खात्यात अनुकंपातून तसेच खेळाडूंच्या राखीव कोट्यातूनही भरती होणे गरजेचे आहे. त्यासाठी बैठक, आंदोलनाच्या माध्यमातून टपाल कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या वतीने भरतीसाठी पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अद्याप दखल घेतली गेली नाही. डाक विभागाच्या प्रशासनासोबत 9 जुलै 2018 रोजी संयुक्‍त कृती समितीची चर्चा यशस्वीरित्या पार पडली. मात्र, त्यानंतर प्रशासनाने चर्चेचा लेखी इतिवृत्तांत देण्यास दिरंगाई केली. असमाधानकारक व ठोस उत्तरे न दिल्यामुळे राज्यव्यापी बेमुदत संपाचे हत्यार उगारण्यात आले आहे. हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावाही डी. आर. देवकर यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − one =